गोंदिया शहर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा पुढाकार

0
14

गोंदिया,दि.१७ : दिड लक्ष लोकसंख्या असलेल्या गोंदिया शहरावर दुसऱ्यांदा पाणीटचाईचे संकट ओढवले आहे. यावर्षी झालेला अपुरा पाऊस व त्यामुळे वैनगंगा नदीच्या पात्रात अत्यंत कमी झालेली पाण्याची पातळी हे मुख्य कारण आहे. डांगुर्ली गावाजवळ वैनगंगा नदीच्या पात्रात गोंदिया शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची उदभव विहिर आहे. नदीचा प्रवाह पुर्णपणे थांबला असून १ कि.मी. परिसरात रेतीच्या पिशव्यांचा बांध घालून पाणी अडविण्यात आले आहे.
गोंदिया शहरावरील पाणीसंकट बिकट होईल याची पुर्वकल्पना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला पुर्वीपासूनच आलेली होती. त्यादृष्टीने कार्यकारी अभियंता श्री.चंद्रिकापुरे यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेवून जानेवारी २०१८ मध्ये एक बैठक आयोजित केली होती व पुढील संभाव्य पाणीटंचाईबाबत जिल्हाधिकारी यांना अवगत केले होते. तेवढ्याच तातडीने जिल्हाधिकारी यांनी संभाव्य पाणीटंचाईची दखल घेवून गोंदियापासून ८० कि.मी. असलेल्या पुजारीटोला या धरणातून १० दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षीत करण्याचे निर्देश पाटबंधारे विभागाला दिले. त्यानुसार १० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा गोंदिया शहरासाठी राखीव ठेवण्यात आला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत मार्चमध्ये परत आढावा घेण्यात आला. कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता यांनी १९ मार्चपासून नदीमध्ये असलेले पाणी लोकांना जास्तीत जास्त दिवस पुरविण्याच्या दृष्टीने दररोज दोन वेळा ऐवजी एक वेळ मुबलक पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने निर्णय घेतला व त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे.
मार्च महिन्याच्या अखेरीस वैनगंगा नदीचा प्रवाह पूर्णपणे बंद झाल्याने नदीपात्रातील उदभव विहिरीमध्ये पाणी कमी यायला लागले व पंप सतत चालविणे कठीण झाले आणि पाणीटंचाई तीव्र झाली. यावर उपाय म्हणून तातडीने २ पंप नदीतील इंटेकवर बसवून पाणी उचलून उदभव विहिरीमध्ये घेण्याचे काम हाती घेतले. या ठिकाणी जिल्हाधिकारी व अधीक्षक अभियंता यांनी देखील भेटी दिल्या. जिल्हाधिकारी यांनी ताबडतोड पुजारीटोला धरणातून पाणी सोडण्याचे निर्देश दिले. त्याप्रमाणे १० एप्रिलपासून २५० क्युसेक याप्रमाणे पाण्याचा विसर्ग पाटबंधारे विभागामार्फत सुरु करण्यात आलेला आहे. ७२ कि.मी.चा कालवा पुढे ८ कि.मी.चा नाला व २ कि.मी. नदीपात्र असा या पाण्याचा प्रवास असणार आहे. प्राधिकरणामार्फत तीन जेसीबीद्वारे ८ कि.मी. नाला खोलीकरण करण्यात आले आहे. तसेच पोकलॅनद्वारे नदीपात्रात विहिरीजवळ सतत पाणी राहील यासाठी दररोज चॅनलींग करण्यात येत आहे.
नदीपात्रात येणारे पाणी जाळीत जास्तीत जास्त दिवस पुरावे याकरीता बंधारा लांबी व उंची वाढविण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. पुजारीटोला धरणातील पाणी लवकरच नदीमध्ये प्राप्त होवून येत्या दोन महिन्यात गोंदिया शहराला पुरेसे पाणी पुरविण्यात येईल. त्यामुळे गोंदियावासीयांनी लोकांमध्ये सभ्रम निर्माण करणाऱ्या भूलथापांना बळी पडू नये. पाणीटंचाई निवारणार्थ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे अथक प्रयत्न सुरु आहे. जे लोक मोटरपंप लावून पाणी ओढतात व ज्यामुळे इतरांना पाणी मिळत नाही यावर निर्बंध लावणे आवश्यक असल्यामुळे सकाळी पाणीपुरवठ्याच्या वेळेत एक तास वीजपुरवठा बंद राहावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रयत्न सुरु आहे. उन्हाळामध्ये आवश्यकतेप्रमाणे गोंदिया शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्यात येईल. असे आवाहन कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग गोंदिया यांनी केले आहे.