जम्मू-काश्मीर: उपमुख्यमंत्र्यांसह भाजपच्या सर्व 9 मंत्र्यांचे राजीनामे

0
7

जम्मू (वृत्तसंस्था),दि.18- जम्मू-काश्मिरात पीडीपी आघाडीच्या सरकारमध्ये सहभागी भाजपच्या 9 मंत्र्यांनी मंगळवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सत शर्मा यांना राजीनामे सोपवले. सूत्रांनुसार, मंगळवारी संध्याकाळी अचानक मंत्र्यांनी राजीनामे दिल्याचे वृत्त आले, यात उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांचेही नाव आहे. सूत्रांनुसार, राजीनामा देण्यासाठी दिल्लीहून हायकमांडचा आदेश आला होता. मेहबूबा मुफ्ती सरकारमध्ये प्रस्तावित फेरबदल पाहता मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. दुसरीकडे हे प्रकरण कठुआशी जोडून पाहिले जात आहे. यादरम्यान, राम माधव 3 दिवसांत दुसऱ्यांदा बुधवारी जम्मूला पोहोचत आहेत. ते येथे पक्षनेत्यांसोबत बैठक घेतील.यापूर्वी कठुआत चिमुकलीवर झालेल्या रेप आणि हत्येच्या घटनेनंतर दोन मंत्र्यांनी उद्योगमंत्री चंद्रप्रकाश गंगा आणि वनमंत्री लालसिंह यांनी राजीनामा दिला होता. यानंतर मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची चर्चा सुरू झाली होती.
या दोन्हींवर कथितरीत्या कठुआ गँगरेपच्या आरोपींचे समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सामील झाल्याचा आरोप होता. दोन्ही मंत्र्यांनी मेहबूबा मुफ्ती यांना राजीनामा सोपवला होता, जो त्यांनी मंजूर केला.तथापि, भाजप नेते राम माधव यांनी स्पष्ट केले होते की, हे मंत्री रॅलीच्या समर्थनार्थ नाही, तर त्यात सहभागी होणाऱ्यांची समजूत घालण्यासाठी आणि परिस्थिती चिघळू नये यासाठी गेले होते.