सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ आता नवीन रंगाच्या पर्यायात !

0
14

मुंबई- दि.१९ :सॅमसंग कंपनीने आपला गॅलेक्सी नोट ८ हा उच्च श्रेणीतील स्मार्टफोन आता भारतीय ग्राहकांना नवीन आणि अत्यंत आकर्षक अशा रंगाच्या पर्यायात सादर करण्याची घोषणा केली आहे. सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत गत सप्टेंबर महिन्यात मिडनाईट ब्लॅक आणि मेपल गोल्ड या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आले होते. यात आता ऑर्किड ग्रे या नवीन रंगाची भर पडणार आहे. हे नवीन मॉडेल आता कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी सादर केले आहे. याचे मूल्य मूळ मॉडेलनुसारच म्हणजे ६७,९९० रुपये आहे. तर यावर पेटीएमतर्फे १० हजार रुपयांच्या कॅशबॅकची ऑफर सध्या सुरू आहे. हा स्मार्टफोन ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी नोट ८च्या या नवीन आवृत्तीमध्ये रंगाचा अपवाद वगळता आधीचेच सर्व फिचर्स आहेत. अर्थात सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ या मॉडेलमध्ये ६.३ इंच आकारमानाचा आणि क्वाड-एचडी म्हणजेच क्युएचडी क्षमतेचा (२९६० बाय १४४० पिक्सल्स) अमोलेड इन्फिनिटी डिस्प्ले आहे. याची रॅम सहा जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात १२ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील एक कॅमेरा हा ड्युअल पिक्सल्स या प्रकारातील तसेच वाईड अँगल सेन्सरने युक्त असून यात एफ/१.७ अपार्चर आणि ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन आदी फिचर्स आहेत. तर दुसर्‍यात एफ/१.४ अपार्चर आणि ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनची सुविधा आहे. यात २ एक्स ऑप्टिकल झूमसह लाईव्ह फोकस आणि ड्युअल कॅप्चर या सुुविधादेखील आहेत. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी नोट ८सोबत सॅमसंग एस हा स्टायलस पेन प्रदान करण्यात आला आहे. याच्या मदतीने युजर स्मार्टफोनच्या लॉकस्क्रीनवरही लिहू शकतो. यात ब्ल्यु-टुथ ५.०चा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. याशिवाय यात एनएफसी व एमएफसी या कनेक्टिव्हिटी असल्यामुळे ‘सॅमसंग पे’ या प्रणालीच्या माध्यमातून व्यवहार करता येतात. सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ या मॉडेलमध्ये बिक्सबी हा कंपनीचे विकसित केलेला व्हर्च्युअल डिजिटल असिस्टंट प्रदान करण्यात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ मध्ये फास्ट व वायरलेस चार्जींगच्या सपोर्टसह ३३०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट ७.१.१ या आवृत्तीवर चालणारे असून हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ आणि डस्ट रेझिस्टंट आहे.

English summary: 
Samsung Galaxy Note 8 Now a new color option!