नागपूरच्या लेखाधिकाऱ्यांना वाशिममध्ये अटक

0
7

नागपूर,दि.20 : ग्राम पंचायतीचा आॅडिट रिपोर्ट उत्तम दर्जाचा तयार करून देण्यासाठी दहा हजारांची लाच मागणाऱ्या दोन लेखाधिकाऱ्यांना सीबीआयच्या पथकाने आज वाशिमच्या एका हॉटेलमध्ये पकडले. महेंद्र जोगेश्वर शुक्ला (वरिष्ठ लेखाधिकारी नागपूर) आणि विजय आनंदराव नंदनवार (लेखाधिकारी, नागपूर) अशी आरोपींची नावे आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, तक्रारकर्ते वाशिम जिल्ह्यातील आहेत. त्यांना ग्रामपंचायतीचा आॅडिट रिपोर्ट उत्तम दर्जाचा हवा होता. त्यासाठी त्यांनी शुक्ला तसेच नंदनवारसोबत संपर्क साधला होता. मनासारखा अहवाल हवा असेल तर १० हजार रुपयांची लाच द्यावी लागेल, असे या दोघांनी म्हटले. चांगले काम असल्यामुळे लाच देणार नाही, अशी भूमिका घेत तक्रारकर्त्यांनी सीबीआयच्या नागपूर युनिटचे अधीक्षक विजयेंद्र बिद्री यांच्याकडे तक्रार नोंदवली. त्यांनी तक्रारीची शहानिशा केल्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सापळा रचण्यात आला. दरम्यान, पंचायतीच्या कामाचे अंकेक्षण केल्यानंतर लाचेची रक्कम घेण्यासाठी शुक्ला आणि नंदनवार यांना वाशिमच्या एका हॉटेलमध्ये गुरुवारी दुपारी तक्रारकर्त्यांनी बोलवून घेतले. हॉटेलमध्ये लाच स्वीकारताच या दोघांना सीबीआयच्या पथकाने ताब्यात घेतले. या कारवाईची माहिती लेखाधिकारी कार्यालयात पोहचल्यानंतर एकच खळबळ उडाली.