मोटो जी ६, जी ६ प्लस व जी ६ प्ले स्मार्टफोन्सची घोषणा

0
13

लेनोव्होची मालकी असणार्‍या मोटोरोलाने जागतिक बाजारपेठेत मोटो जी ६, मोटो जी ६ प्लस आणि जी ६ प्ले या तीन स्मार्टफोन्सला जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मोटो जी ६ मालिकेबाबत प्रचंड उत्सुकतेचे वातावरण निर्मीत झाले होते. याबाबत अनेक लीक्सदेखील समोर आले होते. अखेर या औत्सुक्याला विराम देत, मोटोरोलाने आपले हे तीन नवीन स्मार्टफोन्स बाजारपेठेत उतारले आहेत. यापैकी मोटो जी ६ आणि जी ६ प्ले यांच्यातील बहुतांश फिचर्स समान असून फक्त प्रोसेसर, बॅटरी आणि कॅमेर्‍यात बदल करण्यात आला आहे. तर मोटो जी ६ प्लस हे यातील सर्वात उच्च फिचर्सयुक्त मॉडेल आहे.

मोटो जी ६ या स्मार्टफोनमध्ये ५.७ इंच आकारमानाचा, १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा आणि फुल एचडी प्लस(२१६० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ४५० प्रोसेसर आहे. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा आहे. यामध्ये एफ/१.८ अपार्चर आणि ७६ अंशातील लेन्स असणारा १२ मेगापिक्सल्सचा एक तर एफ/२.२ अपार्चर व ७९ अंशाची लेन्स असणारा ५ मेगापिक्सल्सचा दुसरा असा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ड्युअल एलईडी फ्लॅशसह यात ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरिओ या आवृत्तीवर चालणारे असून यात टर्बोचार्ज तंत्रज्ञानाच्या सपोर्टने युक्त असणारी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी आहे.

मोटो जी ६ प्ले या मॉडेलमध्येही ५.७ इंच आकारमानाचा आणि १९:८ अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले असला तरी तो एचडी रेझोल्युशनचा आहे. यात क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ४३० प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ३ जीबी आणि स्टोअरेज ३२ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा असेल. याच्या मागील बाजूस एफ/२.० अपार्चरयुक्त १३ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असून यातील फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा आहे. तर यातील बॅटरी ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची देण्यात आली आहे.

 मोटो जी ६ प्लस हा या मालिकेतील सर्वात दर्जेदार फिचर्स असणारा स्मार्टफोन आहे. यात क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ६३० प्रोसेसर दिला आहे. याची रॅम ४ जीबी आणि स्टोअरेज ६४ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. यात ५.९३ इंच आकारमानाचा, १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा आणि फुल एचडी प्लस क्षमतेचा डिस्प्ले आहे. यामध्ये एफ/१.८ अपार्चर आणि ७६ अंशातील लेन्स असणारा १२ मेगापिक्सल्सचा एक तर एफ/२.२ अपार्चर व ७९ अंशाची लेन्स असणारा ५ मेगापिक्सल्सचा दुसरा असा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ड्युअल एलईडी फ्लॅशसह यात ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरिओ या आवृत्तीवर चालणारे असून यात टर्बोचार्ज तंत्रज्ञानाच्या सपोर्टने युक्त असणारी ३,२०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी आहे.

मोटो जी ६, मोटो जी ६ प्लस आणि जी ६ प्ले या तिन्ही मॉडेल्सला अनुक्रमे २४९ डॉलर्स (सुमारे १६५०० रूपये); २९९ युरो (सुमारे २४३५० रूपये) आणि १९९ डॉलर्स (सुमारे १३,००० रूपये) या मूल्यांमध्ये बाजारपेठेत उतारण्यात आले आहे. हे मॉडेल्स आधी ब्राझीलमध्ये उपलब्ध करण्यात आले असून लवकरच भारतात दाखल होण्याची शक्यता आहे.

English summary: 
The announcement of the Moto G6, G6 Plus and G6 Play smartphones