नाराज यशवंत सिन्हा यांची भाजपाला सोडचिठ्ठी

0
10

पाटणा,दि.21(वृत्तसंस्था)– भारतीय जनता पक्षाचे बंडखोर नेते आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अखेर भाजप सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पाटणा येथे आयोजित राष्ट्रीय मंचच्या पहिल्या अधिवेशनात त्यांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा जबाबदार असल्याचे म्हटले आहे. यशवंत सिन्हा गेल्या काही महिन्यांपासून भाजप आणि केंद्र सरकारच्या धोरणावर टिकास्त्र सोडत होते. लवकरच ते भाजप सोडतील असा कयास लावला जात होता. त्यांनी याच वर्षी राष्ट्रीय मंच या अराजकीय संघटनेची स्थापना केली आहे.

राजकारणातून सन्यास
– यशवंत सिन्हा म्हणाले, ‘मी निवडणुकीच्या राजकारणातून आधीच सन्यास घेतला होता. तुम्हाला सर्वांना माहितच असेल की 4 वर्षांपूर्वीच निवडणूक लढणार नाही असा निर्णय घेतला होता. तेव्हा काही लोकांना वाटले असेल की आता माझ्या ह्रदयाचे ठोकेही बंद झाले असतील, परंतू आजही माझे ह्रदय देशासाठी धडकत आहे. त्यामुळे जेव्हा देशाचा प्रश्न येईल तेव्हा मी मागे राहाणार नाही. त्यासाठी सर्वात पुढे मी असेल, कारण प्रश्न देशाचा आहे.’

‘देशाची परिस्थिती तुमच्यासमोर ठेवत आहे’
– यशवंत सिन्हा म्हणाले, ‘आज मी तुमच्या समोर उभा आहे तो देशाची स्थिती काय आहे हे सांगण्यासाठी. या स्थितीवर आम्हाला सर्वांना मिळून विचार करावा लागणार आहे. येथे सर्व आहेत. आपल्या सर्वांचा मिळून हा मंच तयार झाला आहे. त्याचे नाव राष्ट्रमंच आहे. येथे आम्ही एक राजकीय पक्ष नाही. किंवा पुढे चालून आपला एक राजकीय पक्ष स्थापन करण्याचा आपला इरादा नाही. मात्र देशाची स्थिती चिंताजनक आहे. त्यावर आपण शांत राहू शकत नाही. आपणे शांत राहिलो तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला दोष देतील, तुम्ही शांत का होते?’
– मोदींचा उल्लेख टाळून सिन्हा म्हणाले, ‘दोस्तो… मी जाणिवपूर्वक मित्रों.. म्हणत नाही. आज आम्ही येथे एकत्र आलो आहोत ते देशातील लोकशाही धोक्यात आहे म्हणून.’