‘स्मार्ट ग्राम’ स्पर्धेसाठी आठ गावे सज्ज

0
10

गोंदिया,दि.22 : शहराप्रमाणेच गावांचा विकास व्हावा व सर्व पायाभूत सुविधा निर्माण करुन आदर्श गावचे स्वप्न साकारावे यासाठी शासनाने ‘स्मार्ट ग्राम’ योजना २०१६ पासून सुरू केली. या योजनेतंर्गत प्रत्येक तालुक्यातील एक, जिल्ह्यातील एक व राज्यातील एका गावची ‘स्मार्ट ग्राम’ म्हणून निवड करण्यात येत आहे. सन २०१८ या वर्षात तालुक्याचे मुल्यमापन झाले असून त्यातील आठ गावे जिल्हास्तरावरील ‘स्मार्ट ग्राम’ स्पर्धेत आली आहेत.

‘स्मार्ट ग्राम’ स्पर्धेत उतरलेल्या गावांचे तालुकास्तरावर मुल्यमापन करण्यात आले. यामध्ये, आमगाव तालुक्यातून वळद. देवरी तालुक्यातील भागी-शिरपूर, सालेकसा तालुक्यातील झालीया, गोरेगाव तालुक्यातील मलपूरी, तिरोडा तालुक्यातील पांजरा, गोंदिया तालुक्यातील मुंडीपार-ढाकणी, सडक-अर्जुनी तालुक्यातील गोंगले व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील शिरेगावबांध या गावांचा समावेश आहे. या यावांची तपासणी सोमवारपासून करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय चमू २३ एप्रिल रोजी आमगाव, सालेकसा व देवरी तालुका, २४ एप्रिल रोजी सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव तालुका व २५ एप्रिल रोजी गोरेगाव, तिरोडा व गोंदिया तालुक्याचे मुल्यमापन करणार आहे. या मुल्यामापनात तालुकास्तरावर प्रथम आलेल्या आठ गावांचे मुल्यमापन जिल्हास्तरावर करण्यात येईल.
हिवरेबाजार या आदर्श गावचे चित्र राज्यातील प्रत्येक गावांमध्ये निर्माण व्हावे, गावांचा सर्वांगिण विकास व्हावा, तेथे सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देऊन ती गावे ‘स्मार्ट ग्राम’ म्हणून ओळखली जावित यासाठी शासनाने २०१६ पासून ‘स्मार्ट ग्राम’ योजना सुरू केली. या योजनेतंर्गत प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यातून १ स्मार्ट ग्राम आणि निवड केलेल्या तालुक्यातील गावांपैकी एका गावची जिल्हास्तरावर ‘स्मार्ट ग्राम’ म्हणून निवड केली जाते.
तालुकास्तरावर ‘स्मार्ट ग्राम’ला प्रत्येकी १० लाख रुपये तर जिल्हास्तरावर निवड केलेल्या ‘स्मार्ट ग्राम’ला ४० लाख रूपयांचा पुरस्कार देण्यात येत आहे. मागील वर्षी ‘स्मार्ट ग्राम’  सडक-अर्जुनी तालुक्यातील कोकणा गाव ‘स्मार्ट ग्राम’ ठरले होते.