मुख्य बातम्या:

बलात्कार करणाऱ्याला फाशी देण्याच्या शिक्षेवर राष्ट्रपतींचं शिक्कामोर्तब

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.22- अल्पवयीन मुलींवर पाशवी बलात्कार करून त्यांचे खून केले गेलेल्या घटनांनी देशभर उठलेली संतापाची उसळली असतानाच केंद्रातील मोदी सरकारने बलात्काऱ्यांना जरब बसेल, अशा कडक शिक्षेची तरतूद केली आहे. केंद्र सरकारनं पॉक्सो कायद्यात दुरुस्ती केली असून, त्या वटहुकूमावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरीची मोहर उमटवली आहे. त्यामुळे आता 12 वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणा-याला कठोरातील कठोर शिक्षा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अध्यादेशानुसार, 16 वर्षे किंवा त्याहून कमी वयाच्या मुलीवर बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार करणा-यांना अटकपूर्व जामीन देण्यास पूर्ण प्रतिबंध असणार आहे. तसेच अशा गुन्हेगारांनी नियमित जामिनासाठी अर्ज केल्यास पब्लिक प्रॉसिक्युटरला व पीडितेच्या प्रतिनिधीला किमान 15 दिवसांची नोटीस दिल्याखेरीज त्या अर्जावर न्यायालय निर्णय देऊ शकणार नाही. या वटहुकूमात बलात्कारपीडितेच्या वयानुसार आरोपीस शिक्षा देण्याची तरतूद आहे. पीडितेचे वय जेवढे कमी तेवढी शिक्षा अधिक असे हे व्यस्त प्रमाण असेल.

Share