तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या!

0
12

गोंदिया,दि.22(खेमेंद्र कटरे)ः-शालेय पोषण आहार योजनेतून कोणत्या शाळेत किती विद्यार्थ्यांना मोफत खिचडी मिळते याची कधीही विचारपूस न करणाऱ्या शासनाने आता चक्क तांदळाची रिकामी पोती विकून पैसा जमविण्याचा आदेश शाळांना दिला आहे. गेल्या सहा वर्षात शाळांमध्ये आलेली तांदळाची पोती विकून तो पैसा शासनजमा करण्याचे आदेश शुक्रवारी धडकल्याने मुख्याध्यापकांची भंबेरी उडाली आहे.
शिक्षण विभागाने चक्क रिकाम्या पोत्यांचा हिशेब मागितला आहे. प्राथमिक शिक्षण संचालक सुनिल चौहान यांनी हे आदेश बजावले आहेत. २०१२ ते २०१८ या सहा वर्षांत शाळांना किती तांदूळ मिळाला, याचा हिशेब शाळांकडे नोंदविलेला आहे. मात्र, रिकाम्या पोत्यांचा हिशेब मागण्यात आल्याने शिक्षक भांबावलेले आहेत.सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत शालेय पोषण आहारासाठी पोत्यांमधून प्रत्येक शाळांमध्ये तांदूळ आणि इतर शालेय पोषण आहार दिला जातो. मात्र रिकामी झालेली पोती तशीच पडून राहतात, पोत्यांचा वापर वैयक्तिक कामासाठी होतो, किंवा ग्रामस्थ आणि शिक्षक ती विकून परस्पर पैसे लाटतात. यामुळे शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.अनेक पोत्यांचा वापर शिक्षक शाळेसाठी किंवा वैयक्तिक कामांसाठी करतात, असा उल्लेख या निर्णयाचे पत्रक जारी करताना सरकारने केला आहे.
सर्व शिक्षा अभियानातून शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. दरवर्षी या योजनेचे लोकलेखा समितीकडून लेखापरीक्षण केले जाते तेव्हा रिकाम्या पोत्यांचा हिशेब मागितला जातो. मात्र अनेक शाळा तो देत नाही. त्याबाबत पुढे कोणीच विचारपूसही करीत नव्हते. सर्वशिक्षा अभियान बंद करून समग्र शिक्षा अभियान यंदा सुरू होत आहे. त्यामुळेच लेखा परीक्षणात सर्वशिक्षा अभियानातील इत्थंभूत हिशेब ‘खरडून’ घेतला जात आहे.