गडचिरोली जंगलात १६ नक्षलींचा खात्मा; ‘सी-६०’ पथकाची सर्वात मोठी कामगिरी

0
29

गडचिरोली/गोंदिया,दि.23 :महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कसनसूर-बोरियाच्या जंगलात रविवारी सकाळी उडालेल्या चकमकीत १६ माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. मृतांमध्ये माओवाद्यांच्या विभागीय समितीचा सचिव श्रीनिवास, विभागीय समितीचा सदस्य साईनाथचा समावेश आहे. श्रीनूवर ७६ लाखांचे बक्षीस होते. गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांचा शिरकाव झाल्यापासून ३८ वर्षांतील ही सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे.

नक्षलवाद विरोधी अभियानात पोलिसांना आज मोठे यश मिळाले असून,या चकमकीत सात नक्षली जखमी झाले. गेल्या चार वर्षातील महाराष्ट्रातील नक्षलवाद्यांविरोधातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटले आहे. त्याआधी तीन एप्रिलला पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. त्यामध्ये दोन महिलांचाही समावेश होता.या कारवाईत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांत विभागीय समितीचा सदस्य असलेला कमांडर साईनाथ आणि सिनू या कुख्यात नक्षल्यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.अनुसूचित जमाती कल्याण समितीचे सदस्य येणार असल्याची माहिती माओवाद्यांना मिळाली होती. यांना लक्ष्य करण्याची योजनाही माओवाद्यांनी आखली होती. या परिसरात वाहनाने जाण्यासाठी पोलिसांनी सदस्यांना मनाई केली होती. परंतु आदिवासींचे जीवनमान, त्यांना मिळणाऱ्या सरकारी योजनांची पाहणी करण्यासाठी समिती सदस्यांनी आग्रह धरल्याने हेलिकॉप्टरने अहेरी-भामरागड असा प्रवास केला. यांच्या सुरक्षेसाठी म्हणून जवान तैनात होते. याच दरम्यान शोधमोहीम राबिवत असताना उडालेल्या चकमकीत १६ माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

श्रीनू याच्यावर महाराष्ट्र सरकारचे २६ लाख, तेलंगण २५ लाख तर छत्तीसगड सरकारने २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. हे माओवादी अहेरी दलमचे असल्याचा दावा गडचिरोलीचे पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे गडचिरोलीत पोहोचले. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख हेलिकॉप्टरने अहेरीत दाखल झाले. सॅटेलाइटवरून जवानांशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. दंडकारण्यात आजवर माओवादविरोधी राबविण्यात आलेल्या अभियानातील सर्वात मोठे यश मानले जात आहे.

गेल्या आठवड्यात घोट येथे नक्षलवाद्यांनी वनविभागाच्या लाकूड डेपोला आग लावली होती. या घटनेनंतर नक्षलवाद्यांविरुद्धची मोहीम तीव्र केली होती. पेरमिली दलम कमांडर साईनाथ याच्या नेतृत्वात दोन ते तीन दलम एकत्र येऊन मोठा घातपात घडविण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.  सकाळी ‘सी-६०’ पथकाला नक्षलवाद्यांचा ठावठिकाणा लागला. याच दरम्यान छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत असलेल्या बोरिया जंगलात नक्षलविरोधी पथक व सीआरपीएफ जवानांवर दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला.जवानांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. धुमश्चक्रीनंतर काही नक्षलवादी पळाले. संध्याकाळपर्यंत १६ नक्षल्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले.पोलिसांनी बंदुका व इतर साहित्यही जप्त केले आहे.ताडगावपासून चिचोडापर्यंत डांबरीकरण असले तरी चिचोडावरून बोरियापर्यंत घनदाट जंगलातून कच्चा रस्ता आहे. मोहिमेतील जवान आणि माओवाद्यांचे मृतदेह आणण्यासाठी पाच भूसुरूंगविरोधी वाहने आणि एक ट्रक पाठविण्यात आला होता. कच्च्या वाटेने खडतर प्रवास करून हे पथक बोरिया गावाजवळ सायंकाळी पाच वाजता पोहोचले. घटनास्थळ गावापासून दोन किलोमीटर दूर पहाडाखाली नदीलगत असल्याने जवानांशी संपर्क होत नव्हता. सॅटेलाइट फोनचाही वापर करण्यात आला. त्यानंतरही संपर्क झाला नाही. संपर्क होईस्तोवर रात्रीचे आठ वाजले होते. त्यानंतर पथक घटनास्थळी पोहोचले. रात्री उशिरा १६ ही माओवाद्यांचे मृतदेह बोरिया गावात आणण्यात आले.

सर्वांत मोठी कारवाई
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या ३८ वर्षांतील नक्षलवादी चळवळीविरोधातील रविवारची कारवाई सर्वांत मोठी मानली जाते. या अगोदर २०१३ मध्ये अहेरी तालुक्‍यातील गोविंदगाव जंगल परिसरात सहा नक्षलवादी ठार झाले होते. त्यानंतर ६ डिसेंबर २०१७ रोजी  सिरोंचा तालुक्‍यातील कल्लेड जंगल परिसरात सात माओवाद्यांचा खातमा करण्यात आला होता.

पावसात अडकले पथक  दुपारपासूनच भामरागड तालुक्यात पाऊस असल्याने नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे पोलिस पथक रात्री दहा वाजेपर्यंत गडचिरोली मुख्यालयात परतले नव्हते. शनिवारी सायंकाळी निघालेल्या या पथकाने रात्रभर पायपीट करून भामरागड गाठल्याचे शेलार यांनी सांगितले.

सिनू उर्फ श्रीकांत उर्फ बिजेंदर नरसिम्हारामलू राऊथू(५१) हा तेलंगणा राज्यातील छल्लगारी येथील रहिवासी असून, त्याने २००३ मध्ये सिरोंचा एलओएसचा सदस्य म्हणून नक्षल चळवळीत आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली. पुढे त्याची एसीएम व डीसीएम म्हणून पदोन्नती झाली.  त्यानंतर २००७ मध्ये सिनूचा प्रेमविवाह दीपा उर्फ आमसूबाई उर्फ गोदावरी रा.आमदाबाद हिच्याशी झाला. दीपा ही जिमलगट्टा एलओएसमध्ये कार्यरत होती. मात्र, काही दिवसांतच दीपा ही दुसऱ्या दलम सदस्यासह पळून गेली आणि नंतर दोघांनीही आंध्रप्रदेश पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्यानंतर सिनूने शामला नामक दुसऱ्या दलम सदस्य महिलेशी लग्न केले. २००९ मध्ये तीने नक्षल्यांचे ३० ते ३५ लाख रुपये घेऊन पळ काढला आणि आंध्रप्रदेश पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. पत्नीने पार्टी फंड घेऊन पळ काढल्याने नक्षल्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी सिनूवर संशय घेऊन त्याला कंपनी क्रमांक १० मध्ये पाठविले. त्यानंतर २०१७ मध्ये सिनूची नियुक्ती दक्षिण गडचिरोलीचा विभागीय सचिव म्हणून करण्यात आली. त्याच्या विरोधात खून, जाळपोळ, अपहरण, मारहाण असे ८२ गुन्हे विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल आहेत.

ठार झालेल्या दुसऱ्या मोठ्या नक्षल्याचे नाव साईनाथ उर्फ डोलेश मादी आत्राम(३६) असे असून, तो अहेरी तालुक्यातील गट्टेपल्ली येथील मूळ रहिवासी होता. पेरमिली दलम कमांडर व विभागीय समिती सदस्य पदावर तो कार्यरत होता. २००४ मध्ये पेरमिली दलम सदस्य म्हणून तो भरती झाला. २००८ मध्ये त्याची अहेरी एलओएसमध्ये बदली झाली. याचवेळी त्याने अॅक्शन टीम सदस्य म्हणूनही काम केले. २०१२ मध्ये पेरमिली दलम कमांडर, २०१४ मध्ये एसीएस, २०१५ मध्ये डीसीएम म्हणून त्याला पदोन्नती मिळाली. त्यापूर्वी साईनाथने पेरमिली एरियात मिलिशिया स्क्वॉड व अॅक्शन टीममध्ये काम केले. साईनाथची पत्नी कैका उर्फ सरिात कोलू कोवाची ही झारेवाडाची रहिवासी होती. ती पेरमिली दलम उपकमांडर होती. परंतु १९ एप्रिल २०१६ रोजी ताडगाव परिसरातील बांडेनगर जंगलात झालेल्या चकमकीत ती ठार झाली होती. तिच्या मृत्युनंतर आज बरोबर दोन वर्षांनी साईनाथला प्राण गमवावा लागला. याच दिवशी साईनाथच्या डाव्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला होता. पत्नीच्या मृत्युमुळे तो हतबल झाला होता. त्याच्याविरुद्ध खून, स्फोट, अपहरण, जाळपोळ, मारपीट इत्यादी ७५ गुन्हे दाखल होते.