कोणत्याही परिस्थितीत आचार संहितेचा भंग होता कामा नये – जिल्हाधिकारी

0
8

चंद्रपूर,दि.23 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या सहा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक 21 मे 2018 रोजी होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची निवडणूक होत असून त्यासाठी प्रशासनाने आज सर्व अधिकारी तसेच राजकीय पक्षांना या निवडणुकीची माहिती दिली. यावेळी कोणत्याही परिस्थितीत आदर्श आचार संहितेचा भंग होणार नाही. याची काळजी घेण्याबाबत जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत.
राज्यात रायगड-रत्नागिरी-सिंधुदूर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, उस्मानाबाद-लातूर-बीड, परभणी-हिंगोली या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघामध्ये निवडणुका होत आहेत. त्यामुळे मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडून आलेल्या निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, गट विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बैठक आज सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, मनपा आयुक्त संजय काकडे, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर आदी उपस्थित होते. दुसरी बैठक दुपारी 3 वाजता राजकीय पक्षांची घेण्यात आली. या बैठकीला जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय कम्युनिष्ट पार्टी, सीपीआय, बहुजन समाज पार्टी या प्रमुख पक्षांच्या प्रतिनिधीची उपस्थिती होती.
या बैठकीमध्ये उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणीटंचाई संदर्भात सुरु असणाऱ्या कामांमध्ये कुठलाही अडथळा नसेल असे स्पष्ट करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या नियमित बैठकांमध्ये आचार संहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी. जुनी सुरु असलेली कामे बंद करु नये, मात्र आवश्यकता नसलेली व निवडणुकीवर प्रभाव टाकणारी कामे नव्याने सुरु करु नये. तसेच पदाधिकाऱ्यांना वाहने देण्यात येऊ नयेत, कोणतेही भूमिपुजन, शुभारंभ अशा प्रकारचे राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नयेत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्यात आली आहे. या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती, महानगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायतचे सदस्य मतदान करणार आहेत. सदर निवडणुकीच्या संबंधाने कोणतीही तक्रार असल्यास दुरध्वनी क्रमांक 07172-270322 वर संपर्क साधावा.

निवडणूक कार्यक्रम
या स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीसाठी चंद्रपूर जिल्ह्यात 8 उपविभागीय कार्यालय तर वर्धा येथे 3 व गडचिरोली येथे 6 उपविभागीय कार्यालयात मतदान होणार आहे. 21 मे रोजी मतदान तर 24 मे रोजी मतमोजणी असा कार्यक्रम निवडणूक आयोगाने घोषित केला असून या संदर्भातील संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे आहे. या निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक 26 एप्रिल 2018 असून नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक 3 मे 2018 आहे. नामनिर्देशन पत्रांची छाणनी 4 मे तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 7 मे 2018 असा आहे. मतदान दिनांक 21 मे रोजी सकाळी 8 ते सायं.4 वेळात घेण्यात येणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी दिनांक 24 मे 2018 रोजी होणार असून निवडणुकीचा निकाल प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक 29 मे 2018 आहे.