न्यू नागझिरा अभयारण्य नव्हे,उमरझरी अभयारण्य नाव द्या-तायवाडे

0
36

गोंदिया,दि.25ः- ब्रिटिशांच्या राजवटीत अधिकृत नोंद असलेल्या उमरझरी राखीव जंगलाला शासनाने अभयारण्य घोषित करून न्यू नागझिरा असे नाव दिले. सरकार दप्तरी न्यू नागझिरा नावाचा कुठेही उल्लेख नसतानाही याविषयीचा निर्णय घेण्यात आल्याने गावकऱ्यांनी विरोध केला. मात्र अधिकाऱ्यांनी त्याची दखल न घेता न्यू नागझिरा असे नामकरण केले. अलीकडेच उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याला उमरेड-पवनी-कऱ्हांडला हे नाव देण्यात आले. त्यामुळे न्यू नागझिरा अभयारण्याचे नाव बदलून उमरझरी वन्यजीव अभयारण्य असे घोषित करण्यात यावे, अशी मागणी गोंदिया जिल्हा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेश तायवाडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
तायवाडे यांनी दिलेल्या पत्रकानुसार ब्रिटिशांनी १८७९मध्ये भंडारा-गोंदिया जिल्ह्यात उमरझरी, प्रतापगड व बावनथडी अशा तीन राखीव जंगलांची घोषणा केली होती. स्वातंत्र्यानंतर या जंगलांचे विभाजन करून स्थानिक गावांच्या नावानुसार जंगलांना नावे दिली. त्यानंतर वन्यजीवांच्या संरक्षणासाठी अभयारण्य व व्याघ्र प्रकल्प तयार करण्यात आले. त्यालाही स्थानिक गावांच्या नावानुसारच नावे देण्यात आली आहेत. या नावावरूनच जंगलाची ओळख व महत्व कळते. आता अस्तित्वात असलेल्या नागझिरा अभयारण्याला लागून उमरझरीचे जंगल आहे. २०१३मध्ये राज्य शासनाने अधिसूचना काढून या जंगलाला अभयारण्याचा दर्जा दिला व त्याला न्यू नागझिरा असे नाव दिले. न्यू नागझिरा नावाचा इतिहासात कुठेही उल्लेख नाही. त्याचे कुठे रेकॉर्डही नाही. या अभयारण्यात सर्वाधिक जंगल हे उमरझरीचेच आहे. दरम्यानच्या काळात कोका आणि उमरेड-कऱ्हांडला हे अभयारण्यही उदयास आले. परंतु, या अभयारण्यांना स्थानिक गावांच्या नावानुसारच नाव देण्यात आले. मग उमरझरीवरच अन्याय का, असा सवालही करण्यात येत आहे.
उमरझरीच्या जंगलाला २०१२मध्ये न्यू नागझिरा असे नाव देण्यात येणार असल्याने त्यावेळी विरोधही करण्यात आला होता. परंतु, मुंबईतील अधिकाऱ्यांनी काहीही ऐकून घेतले नाही. आता उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याला उमरेड-पवनी-कऱ्हांडला असे नाव दिल्याने न्यू नागझिरा हे नाव हद्दपार करून उमरझरी वन्यजीव अभयारण्याची अधिसूचना काढावी, अशी मागणी राजेशकुमार तायवाडे  यांनी केलेली आहे.