बिबट मृत्यूप्रकरणाचा तपास थंडबस्त्यात

0
9

भंडारा,दि.25ः-विजेच्या तारांचा स्पर्श होऊन मृत्युमुखी पडलेल्या बिबट्याला राष्ट्रीय महामार्गाजवळ फेकून दिल्याची घटना ११ एप्रिल रोजी उघडकीस आली होती. या घटनेला दोन आठवडे लोटूनही यातील आरोपींपर्यंत वन विभाग पोहचू शकले नाही. एकामागोमाग वन्यप्राण्यांचा जीव जात असताना त्यातील दोषींना पाठीशी घातले जात असल्याने वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
११ एप्रिल रोजी पलाडी येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला एक बिबट मृतावस्थेत आढळून आला होता. बिबट्याची तपासणी केली असता त्याच्या पायाला मोठे व्रण असल्याचे दिसून आले. तसेच बिबट्याने जिवंत तार तोंडात घेतल्याने त्याची जीभ जळाल्याचे आढळून आले. उर्वरित सर्व अवयव शाबूत होते. त्यामुळे विजेच्या धक्क्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. शिवाय ही घटना उघडकीस येऊ नये म्हणून बिबट्याचा अपघाती मृत्यू दाखविण्यासाठी त्याला राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला आणून फेकण्यात आले होते. ही अत्यंत गंभीर बाब असून घटनेच्या दोन आठवड्यानंतरही वन विभाग आरोपींपर्यंत पोहचू शकले नाही.
ज्याठिकाणी बिबट मृतावस्थेत आढळले त्याच परिसरात त्याचा विजेच्या शॉकने मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. घटनेनंतर वन विभागाने चौकशी केली असता त्यांना अद्याप काहीही आढळून आले नाही. वन विभागाला आरोपींचा ठावठिकाणा माहित आहे. परंतु, त्यांच्यावर कारवाई करण्यास दिरंगाई केली जात असल्याचा आरोप आता होत आहे. एकीकडे वन आणि वन्यजीव यांच्या संर्वधनासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना दुसरीकडे वन्यप्राण्यांचे असे हकनाक बळी जात आहेत. शिवाय त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्यांचा शोधही घेतला जात नसल्याने वन्यप्रेमींमध्ये असंतोष निर्माण होत आहे.