इन्स्टिट्युटने 59 विद्यार्थिनींची शिष्यवृत्ती हडपली; फसवणुकीचा गुन्हा दाखल

0
11

अमरावती,दि,.25- विद्यार्थिनींना व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या शहरातील एका इन्स्टिट्युटने तब्बल ५९ विद्यार्थिनींची शिष्यवृत्ती हडपल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. २४) समोर आला असून, या प्रकरणी एका विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी मंगळवारी रात्री प्रशिक्षण देणाऱ्या संबंधित इन्स्टिट्युटच्या अध्यक्ष व संचालकांसह प्रकल्प आदिवासी विकास विभागाच्या संबधित अधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

विद्यार्थिनींना पारपरिक शिक्षणासोबत व्यावसायिक शिक्षण मिळावे म्हणून पाच ते सहा वर्षांपूर्वी एक योजना सुरू केली होती. इन्स्टिट्युटमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थीनीला शासनाच्यावतीने २ हजार ३०० रुपये शिष्यवृत्ती देण्याचे ठरले. दरम्यान अमरावती शहरातील फुलवंताबाई इन्स्टिट्युट ऑफ कॉम्पुटर इन्फॉरमेशन, गाडगेनगर, अमरावती यांनीही विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम देण्यासाठी २०१२ – १३ मध्ये गाडगेनगरमधील आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहात राहणाऱ्या मुलींना या इन्स्टिट्युटमधील व्यक्ती जाऊन भेटला व त्याने सदर व्यावसायिक अभ्यासक्रम करण्यासाठी इच्छूक मुलींना विचारणा केली.इन्स्टिट्युटमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या वर्ष २०१२ – १३ मधील ५९ विद्यार्थिनींच्या नावावरील शिष्यवृत्ती प्रत्येकी २ हजार ३०० या प्रमाणे १ लाख ३५ हजार ७०० रुपये परस्पर उचलण्यात आली. शिष्यवृत्ती संबधित विद्यार्थिनींच्या बँक खात्यावर जमा व्हायला पाहिजे होती. मात्र इन्स्टिट्युट व प्रकल्प आदिवासी विकास विभाग यांच्या संबधित अधिकाऱ्यांनी परस्पर रक्कम हडपल्याचे तक्रारीत नमूद असल्यामुळे गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.