दूधाचे दर कमी देण्याचे प्रकरण, कारवाईसाठी वरिष्ठांकडे सादर

0
13

गोंदिया,दि.२६ :जिल्हा दुग्ध संघामार्फत संकलीत होत असलेले जास्तीत जास्त दूध शासन स्वीकारत असल्याने शासनाने निर्धारीत केलेल्या दरानुसार दूध उत्पादक सहकारी संस्थांना दूधाचे दर देणे गोंदिया जिल्हा दूध संघास बंधनकारक आहे. परंतू गोंदिया दूध संघामार्फत दूध उत्पाकद सहकारी संस्थांना शासनाने निश्चित केलेले प्रति लिटर दर २७ रुपये न देता २२ लिटर प्रति लिटर दूधाचे दर देण्यात असल्याची बाब जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांच्या निदर्शनास तक्रारीद्वारे आली. तसेच कमी दर देत असल्याबाबत दुग्ध उत्पादकांची ३० जानेवारी २०१८ रोजीची तक्रार कार्यालयास प्राप्त झाली. त्यानुसार गोंदिया जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघास दूध उत्पादकांना कमी दूध दर देत असल्याबाबतचा खुलासा सादर करण्याबाबत कार्यालयामार्फत तसेच विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) नागपूर यांचेमार्फत गोंदिया दूध संघास कळविण्यात आले होते. गोंदिया दूध संघाने केलेल्या खुलाशामध्ये शासन पुरवठ्या व्यतिरिक्त संघाकडील अतिरिक्त दूध महानंदला २० रुपये प्रति लिटर या दराने विक्री झाले आहे. त्यामुळे संघाचे आर्थिक नुकसान होत असल्याने २१ डिसेंबर २०१७ पासून ३ रुपये प्रति लिटर आणि २४ जानेवारी २०१८ पासून २ रुपये प्रति लिटर दर कमी करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्याकडून सादर करण्यात आलेला खुलासा संयुक्तीक वाटत नसल्याने व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अन्वये जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघावर कारवाई करण्याचे अधिकार विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) नागपूर यांचे अंतर्गत येत असल्याने सदर तक्रारीवर चौकशी करुन योग्य कार्यवाहीकरीता विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) नागपूर यांचेकडे प्रकरण पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांनी दिली आहे.

जिल्ह्यात शासन, सहकारी व खाजगी दुग्ध डेअरीमार्फत जवळपास ४९ हजार लिटर दुधाचे दररोज संकलन करण्यात येते. त्यापैकी गोंदिया जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघामार्फत एकूण ७८ दुग्ध उत्पादक सहकारी संस्थांचे ८ हजार लिटर दूध दररोज संकलीत करण्यात येते. सदर संकलीत केलेले सर्व दूध गोंदिया जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संस्थामार्फत शासनास पुरवठा करण्यात येत आहे. हे संकलीत झालेले दूध शासकीय दूध योजना गोंदिया व शासकीय दूध शितकरण केंद्र कोहमारा येथे पुरवठा करण्यात येत आहे. शासनाने गाईच्या दुधाकरीता ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ. गुणप्रतीच्या दुधाचा दर २७ रुपये प्रति लिटर व म्हशीच्या दुधाकरीता ६ फॅट व ९ एस.एन.एफ. गुणप्रतीच्या दुधाकरीता दर ३६ रुपये प्रति लिटर इतका निश्चित केला आहे.
शासनाने निश्चित केलेले प्रति लिटर दूधाचे दर दूध उत्पादकांना गोंदिया जिल्हा दुग्ध सहकारी संघ देत नसल्याचे १० डिसेंबर २०१७ रोजी विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) नागपूर यांचेमार्फत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९ अ (३) अंतर्गत कारणे दाखवा नोटीस निर्गमीत केलेली होती. दरम्यान दूध संघाच्या आर्थिक अडचणी व तोट्यामुळे शासनाचे २५ जानेवारी २०१८ रोजी निबंधकांनी कलम ७९ अ (३) अंतर्गत बजावण्यात आलेल्या नोटीसवर दोन महिन्याची स्थगिती दिली होती. सदर स्थगितीची कालमर्यादा संपल्यावर गोंदिया जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या सर्व पदाधिकारी आणि संचालकांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९ अ (३) अन्वये ९ एप्रिल २०१८ रोजी नोटीस निर्गमीत करुन सुनावणी १९ एप्रिल रोजी निश्चित करण्यात आली.
आनंद दूध उत्पादक सहकारी संस्था मर्या.हरसिंगटोला व इतर ५ दुग्ध सहकारी संस्था ता.गोंदिया यांची जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाकडून दूधाचे कमी दर आकारणे बाबतची तक्रार जिल्हाधिकारी यांचेकडे करण्यात आली. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अन्वये जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघावर कारवाई करण्याचे अधिकार विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) नागपूर यांच्या अंतर्गत येत असल्यामुळे सदर तक्रारीवर चौकशी करुन पुढील योग्य कार्यवाहीसाठी विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) नागपूर यांचेकडे ६ एप्रिल रोजी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांनी खुलाशाद्वारे दिली आहे.