मलेरीयावर मात करण्यासाठी जिल्हा डासमुक्त करा- रमेश अंबुले

0
10

जागतिक हिवताप दिन साजरा
ङ्घ उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी-कर्मचारी सन्मानीत
गोंदिया,दि.२६ : सांडपाण्याची योग्य विल्हेवाट केली नाही तर मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे मलेरीयासारख्या आजाराला बळी पडावे लागते. मलेरीयावर मात करण्यासाठी जिल्हा डासमुक्त करा. असे आवाहन जि.प.आरोग्य व शिक्षण स‍मिती सभापती रमेश अंबुले यांनी केले.
२५ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात जागतिक हिवताप दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून श्री.अंबुले बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.महिला व बालकल्याण समिती सभापती लता दोनोडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे, सहायक जिल्हा हिवताप अधिकारी श्री.राऊत, पत्रकार एच.एच.पारधी यांची उपस्थिती होती.
मलेरियासारख्या आजारावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने दक्ष राहावे असे सांगून श्री.अंबुले म्हणाले, सांडपाणी रस्त्याने वाहणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी. ज्यांनी मलेरीया निर्मुलनासाठी चांगले काम केले आहे ते अभिनंदनास पात्र असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीमती दोनोडे म्हणाल्या, आरोग्य चांगले राहावे यासाठी शासनाच्या विविध आरोग्य विषयक योजना आहेत. प्रत्येकाने आपले घर व परिसर स्वच्छ ठेवले पाहिजे. डासांची उत्पत्तीच होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आरोग्य विभागाने ज्या गावामध्ये डास आहेत तेथे नियमीत फवारणी करावी, त्यामुळे मलेरियासारखे आजार होणार नाही असे त्यांनी सांगितले.श्री.पातुरकर म्हणाले, कुटूंब कल्याण व मलेरीया निर्मुलन कार्यक्रम बऱ्याच वर्षापासून सुरु आहे. नियोजनात चुका झाल्या की रुग्णांच्या प्रमाणात वाढ होते. आरोग्य सेवा झपाट्याने या रोगावर मात करण्यासाठी काम करीत आहे. कायाकल्प योजना व लोकसहभागातून आरोग्य विभाग मलेरीया या आजारावर मात करण्यासाठी काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.निमगडे म्हणाले, हिवताप हा आजार राज्याच्या काही भागात आहे. गोंदिया व गडचिरोली हे जिल्हे मोठ्या प्रमाणात जंगलव्याप्त असल्यामुळे आणि शेजारी मध्यप्रदेश आणि छत्तीसगड हे दोन्ही राज्य लागून असल्यामुळे कामानिमित्त स्थलांतर करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. विशेषत: जिल्ह्यातील देवरी व सालेकसा तालुक्यातील या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहे. मलेरियाच्या डासापासून बचावासाठी मोठ्या प्रमाणात मच्छरदाण्यांचे सुध्दा या भागात वितरण करण्यात आले आहे. सांडपाण्याचे योग्य नियोजन केले तर डासाची उत्पत्ती होणार नाही व या आजारावर मात करता येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.श्री.वाळके म्हणाले, मच्छरांपासून हा आजार होतो. मलेरियामुळे विकासात अडथळा निर्माण झाला आहे. या आजारावर मात करण्यासाठी आबाल वृध्दांना आरोग्य शिक्षण देणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात या आजाराचे प्रमाण जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मलेरीयाच्या निर्मुलनासाठी उत्कृष्ट कार्य करणारे दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.ओ.जी.थोटे, डॉ.नरेश येरणे, मुल्ला प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.विजय पटले, ककोडीचे डॉ.गजानन काळे, केशोरीचे डॉ.पिंकू मंडल, धाबेपवनीचे डॉ.ए.बी.हजारे, खोडशिवनीचे डॉ.खोटेले, शेंडाचे डॉ.डुंभरे, तसेच प्रत्येक तालुक्यातील ३ आशा कार्यकर्ती, १ आरोग्य सहायक, १ आरोग्य सेवक, आरोग्य पर्यवेक्षक व १ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांचा व काही पत्रकार बांधवांचा पुष्पगुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी, पत्रकार बांधव, आशा सेविका यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे, संचालन किशोर भालेराव यांनी केले. उपस्थितांचे आभार वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा येळे यांनी मानले.