नांदेडात पोलीस भरती घोटाळा :११ जणांना अटक

0
11

नांदेड दि.२६ :: राज्यात पोलीस भरतीत झालेले घोटाळे गाजत असतानाच आता नांदेड येथेही लेखी परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. परीक्षार्थिंनी न सोडविलेल्या उत्तरपत्रिका पुन्हा लिहून दिल्याचे उजेडात आले आहे. या प्रकरणी २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून ११ जणांना अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
६९ पोलीस शिपाई पदासाठी १२ मार्च ते १ एप्रिल २०१८ या कालावधीत पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रिया पार पडली. या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षेदरम्यान काही उमेदवारांनी उत्तरपत्रिका जाणीवपूर्वक कोºया ठेवल्या. पेपर तपासणीच्या वेळी संगणकीय विभागात काम करणाºया आॅपरेटर्समार्फत रिकाम्या उत्तरपत्रिकेवर योग्य उत्तरे भरून त्यांना ९० गुण बहाल करण्यात आले.
या गैरव्यवहारात पो.कॉ. नामदेव ढाकणे (औरंगाबाद), राज्य राखीव दलाच्या जालना येथील ग्रुप ३चा पो.कॉ. शुक्राचार्य बबन टेकाळे, शेख आगा, सांगलीच्या एसएसजी सॉफ्टवेअरचे शिरीष अवधूत, स्वप्निल साळुंके, आॅपरेटर प्रवीण भाटकर आणि दिनेश गजभारे यांचा सहभाग आढळून आला. तसेच काही जणांनी भरती होण्यासाठी प्रत्येकी साडेसात लाख रुपये देण्याचे कबूल करून खोटे दस्तावेज तयार करून ते मूळ दस्तावेजाजागी खरे म्हणून वापरले. या प्रकरणी नऊ उमेदवार तसेच सॉफ्टवेअर कंपनीच्या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा आॅपरेटर प्रवीण भाटकर आहे.पोलीस भरतीसाठी परीक्षा दिलेल्या समाधान सुखदेव मस्के आणि किरणअप्पा मस्के (रा. देऊळगाव राजा) या दोघांना समान गुण मिळाले. देऊळगाव राजा येथील अन्य पाच जणही लेखी परीक्षेत ९० गुणांपर्यंत पोहोचले होते. एकाच गावातील सर्वांना जवळपास सारखे गुण मिळाल्याने संशय बळावला. पोलीस अधिकाºयांनी लेखी परीक्षेचे छायाचित्रण तपासले असता सदर परीक्षार्थी उत्तरे सोडविण्याऐवजी निवांत बसून असल्याचे दिसून आले. ज्यांनी पेपरच सोडविला नाही, त्यांना गुण कसे मिळाले? अधिकाºयांनी त्यांच्या उत्तरपत्रिका पुन्हा तपासल्या असता त्यात उत्तरे लिहिल्याचे आढळून आले! अधिक चौकशीत या भरती प्रक्रियेत संगणकीय विभाग सांभाळणाºया एसएसडी सॉफ्टवेअर कंपनीच्या कर्मचाºयांसह ओएमआर आॅपरेटर आणि पोलीस कर्मचारीही सहभागी असल्याचे उघड झाले.