माजी आमदार आनंदराव गेडाम यांची आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

0
42

गडचिरोली,दि.२६: आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांची आदिवासी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोक गहलोत यांनी (दि.२५) आनंदराव गेडाम यांच्या नियुक्तीचे पत्र जारी केले. श्री.गहलोत यांनी तीन राज्यांच्या आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली. त्यात अमरजित भगत(छत्तीसगड), डॉ.सुशील मरांडी(झारखंड) व आनंदराव गेडाम(महाराष्ट्र) यांचा समावेश आहे.

आनंदराव गेडाम हे २००४ ते २०१४ अशी दहा वर्षे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार होते. तत्पूर्वी ते जिल्हा परिषद सदस्यही होते. आदिवासी विद्यार्थी संघाच्या चळवळीतून श्री.गेडाम यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. १९८६ मध्ये आरमोरीत केवळ १८ आदिवासी विद्यार्थी शिकत असताना श्री.गेडाम यांनी आरमोरीत आदिवासी विद्यार्थी संघाची स्थापना केली. त्यावेळी ते शाखेचे सचिव होते. त्यानंतर त्यांनी चंद्रपूर व भंडारा जिल्ह्याचे आविसंचे संघटक म्हणूनही काम केले. अनुभव व आदिवासींच्या हितासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने आनंदराव गेडाम यांची आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबद्दल श्री.गेडाम यांचे चाहत्यांनी अभिनंदन केले आहे.