डिजिटल सातबाराचे 300 गावात महाराष्ट्र दिनापासून वितरण- अनूप कुमार

0
12

आदर्श भूमी अभिलेख स्पर्धेत मूल प्रथम
नागपूर,दि.36 : 
भूमी अभिलेखांचे डिजिटलायझेशन होत असल्यामुळे जनतेला आवश्यक असलेले अभिलेख सहज आणि सुलभ होत आहेत. येत्या महाराष्ट्र दिनापासून विभागातील 300 गावांमध्ये शेतकऱ्यांना डिजिटल सातबाराच्या वाटपाला सुरुवात होत असल्याची माहिती विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी आज येथे दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात भूमी अभिलेख विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘आदर्श अभिलेख कक्ष स्पर्धा 2017-18’ पुरस्कार वितरण समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, भूमी अभिलेख उपसंचालक बाळासाहेब काळे, परीविक्षाधिन अधिकारी श्रीमती डॉ. इंदूराणी जाखड, श्रीकृष्ण पांचाळ, विभागातील भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक सूर्यकांत मोरे, एम. बी. पाटील, जी. बी. डाबेराव, अभय जोशी, पी. जी. मेश्राम आदी उपस्थित होते.आतापर्यंत कार्यालयीन पद्धती ही हस्तलिखित स्वरुपाची होती. त्यामुळे कार्यालयास दस्तावेजाची देखभाल करणे हा गहन प्रश्न होता. परंतु, डिजिटलाईजेशनमुळे दस्तावेजांची देखभाल करणे सोपे झाले आहे. भूमी अभिलेख कार्यालय ‘आम्ही लोकांसाठी करीत आहोत.’ ही भावना ठेऊन हस्तलिखीत शासकीय दस्तावेजाचे डिजिटलाईजेशन करण्यावर भर देत असल्याने येणाऱ्या काळात नागरिकांना त्याचा लाभ मिळणार आहे.
भूमी अभिलेख कार्यालयाने हस्तलिखीत दस्तावेजाचे संगणकीकृत रेकॉर्डसोबतच हस्तलिखित पुस्तिके देखील तयार केली आहे. त्यामुळे ही शासकीय कागदपत्रे हाताळणीस व शोधण्यास सहज उपलब्ध होणार आहेत. यांचा सर्वात मोठा फायदा शेतकरी वर्गास होईल. सातबारा व शेतीसंबंधी दस्तावेज अगदी काही वेळात त्यांना हवे ते कागदपत्र कार्यालयात एका क्लिक वर उपलब्ध होणार आहेत. भूमी अभिलेख कार्यालयाने स्वीकारलेल्या या बदलास विभागातील इतरही कार्यालयाने स्वीकारून आपले कार्यालय डिजिटल करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अपेक्षेनुरुप नागपूर जिल्हा हा डिजिटलायझेशनच्या अंमलबजावणीत प्रथम स्थानावर येईल, असा विश्वास व्यक्त करीत भूमी अभिलेख कार्यालयाचे उपसंचालक बाळासाहेब काळे यांनी राबविलेल्या उपक्रमाची विभागीय आयुक्तांनी स्तूती केली.
राज्यात 43 हजार गावांपैकी 40 हजार गावांचे अचूक डिजिटल सातबाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. देशात कर्नाटकनंतर येणाऱ्या काळात महाराष्ट्राला प्रथम स्थान मिळेल, अशी अपेक्षा भूमी अभिलेख संचालक एस. चोक्कलिंगम यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, येत्या एक वर्षात प्रॉपर्टी कार्ड डिजिटल पद्धतीने उपलब्ध व्हावे यासाठी उपाययोजना केली जात आहे. या कार्यात यश मिळाल्यास डिजिटल प्रॉपर्टी कार्ड वितरणाची सुरुवात ही राज्यात नागपूर जिल्ह्यातून केली जाईल. याशिवाय भूमी अभिलेख कार्यालय मोबाईल ॲपच्या माध्यमातून नागरिकांच्या घरा-घरापर्यत पोहोचविण्यासाठी विभाग कार्य करण्यात येणार आहे. पुरस्कार विजेता मूल भूमी अभिलेख कार्यालयाचे उप अधीक्षक किरण माने यांनी सत्कारास उत्तर दिले. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती रेणुका देशकर तर आभार जी. बी. डाबेराव यांनी मानले.
मूल भूमी अभिलेख कार्यालय प्रथम
भूमी अभिलेख विभागाच्या आदर्श भूमी अभिलेख कक्ष स्पर्धेतील विजयी कार्यालयांना बक्षीस देण्यात आले. त्यामध्ये ‘आदर्श अभिलेख कक्ष’ स्पर्धेत विभागस्तरावर उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय मूलने प्रथम क्रमांक पटकावला. 11 हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. दुसरा पुरस्कार उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय उमरेड तर तृतीय पुरस्कार उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय सालेकसा यांना अनुक्रमे 7 व 5 हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. जिल्हास्तरीय स्पर्धेत जिल्हा अधीक्षक कार्यालय गडचिरोली, उप अधीक्षक कार्यालय भंडारा, उप अधीक्षक कार्यालय कारंजा, उप अधीक्षक कार्यालय सालेकसा, उप अधीक्षक कार्यालय उमरेड, उप अधीक्षक कार्यालय मूल यांना प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.