पोलीस भरती घोटाळा प्रकरणी आणखी तिघांना अटक

0
10

नांदेड,दि.28- नांदेड जिल्हा पोलीस भरती घोटाळा प्रकरणी नांदेड पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली आहे. न्यायालयाने या तिघांना ४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. व पूर्वी अटक झालेल्या बारा जणांना सात दिवसाची पोलीस कोठडी आधीच मिळाली आहे दरम्यान, या भरती घोटाळ्याचा तपास आता सहायक पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.नांदेड पोलीस भरतीत पोलीस शिपाई पदासाठी एप्रिल महिन्यात झालेल्या लेखी परिक्षेत १३ विद्यार्थ्यांना ९० पेक्षा जास्त गुण मिळाल्याने पोलिसांना याचा संशय आला.यातील बारा आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली होती. या सर्वांना ३ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

शुक्रवारी रात्री पोलिसांनी या तपासाची चक्रे वेगाने फिरवत कृष्णा जाधव (रा.सावरखेड भोई ता.देऊळगाव राजा), हनुमान भिसाडे (रा.रिसोड जि.वाशिम) आणि नांदेड जिल्ह्यातील बहाद्दरपूरा ता. कंधार येथील रहिवाशी रामदास भालेराव या तिघांना अटक केली. शनिवारी या तिघांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना ४ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता सदरचा तपास सहायक पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.