राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड

0
8

पुणे,दि.२९ :राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली. राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी बैठकीनंतर जयंत पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.

मावळते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याने ही निवड करण्यात आली. तटकरे यांनीच जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा प्रस्ताव मांडला. प्रदेश उपाध्यक्ष म्हणून प्रवक्ते नवाब मलिक आणि प्रदेश सरचिटणीस म्हणून शिवाजीराव गर्जे यांची निवड करण्यात आली आहे. तर खजिनदारपदी हेमंत टकले यांची फेरनिवड करण्यात आली.

शरद पवार यांनी पुण्यातील मोती बाग या निवासस्थानी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीतच जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.या बैठकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, प्रफ्फुल पटेल, विजयसिंह मोहिते पाटील, डी.पी.त्रिपाठी, गणेश नाईक धनंजय मुंडे, जयंत पाटील, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, यांच्यासह अन्य प्रमुख नेते उपस्थित होते.