भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक राष्ट्रवादीच लढणार

0
18

नागपूर,दि.30- आम्हाला भाजपमुक्त महाराष्ट्र करायचा आहे. भंडारा-गोंदियामधून याची सुरूवात करून देशात आम्हाला एक संदेश द्यायचा आहे. मी आणि प्रफुल्ल पटेल हे मिळून उमेदवार देणार आहोत. येत्या दोन दिवसात त्याचा निर्णय होईल, अशी भूमिका घेत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भंडारा गोंदिया ही जागा राष्ट्रवादीला सोडण्याचे संकेत दिले. काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष ही पोटनिवडणुक एकदिलाने लढतील असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

भंडारा- गोंदिया आणि पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार या दोन्ही मतदारसंघात 28 मे रोजी मतदान होणार आहे, तर 31 मे रोजी निकाल जाहीर होईल.3 मे पासून निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरूवात होणार असून 10 मे ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. मात्र, नाना पटोले यांची सिटिंग जागा काँग्रेसने लढवावी की राष्ट्रवादीने यावर एकमत होताना दिसत नाहीये. मात्र, आज नाना पटोले यांनी माध्यमांसमोर येत मवाळ भूमिका घेतली व राष्ट्रवादीसाठी ही जागा सोडण्याचे स्पष्ट संकेत दिले. तसेच आपले व प्रफुल्ल पटेल यांच्यातील वाद संपल्याचे जाहीर केले.

नाना पटोले म्हणाले, गोंदियाची पोटनिवडणूक कोण लढविणार याचा निर्णय येत्या एक-दोन दिवसात हायकमांड घेतील. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादी ही पोटनिवडणूक एकदिलाने लढविणार आहे. आम्हाला भाजपमुक्त महाराष्ट्र करायचा आहे आणि त्याची सुरूवात या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने करणार आहोत. याद्वारे आम्ही राज्याला व देशाला एक संदेश देणार आहोत. मला किंवा काँग्रेस कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली तर प्रफुल्ल पटेल व राष्ट्रवादीची टीम आमचा प्रचार करेल किंवा राष्ट्रवादीने हा निवडणूक लढविली तर ही माझी निवडणूक म्हणून प्रचार करेन असे नाना पटोले यांनी सांगितले.