शेतीला पाणी न मिळाल्यास निवडणुकीवर बहिष्कार

0
19

अर्जुनी मोरगाव,दि.30 : शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याकरिता शेतकºयांना सिंचनाची सोय अतिशय महत्वाची आहे. बोंडगावदेवी येथून जवळपास १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या इटियाडोह धरणाचे पाणी १०० किमीपेक्षा जास्त अंतरावर पुरविला जाते. पण बोंडगावदेवी व परिसरातील २२ गावांना धरणाचे पाणी मिळत नाही. या धरणाचे पाणी सदर गावांतील शेतीला न मिळाल्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सदर धरणाचे पाणी बोंडगावदेवी व परिसरातील शेतीला मिळावे याकरिता लोकप्रतिनिधींना अनेकदा सांगण्यात आले. बºयाचदा निवेदनसुद्धा देण्यात आले. परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिल्याचे दिसून येत नाही. त्याचाच एक भाग म्हणून विदर्भ व्यसनमुक्ती संघटनेचे सल्लागार यशवंत उके यांच्या पुढाकाराने अर्जुनी-मोरगावचे तहसीलदार सी.आर. मंडारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
त्या निवेदनानुसार, येणाºया लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी इटियाडोह धरणाचे पाणी शेतीकरिता बोंडगावदेवी व परिसरातील गावांना न मिळाल्यास सदर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा संकल्प करण्यात आला आहे. परिसरातील विविध समाजसेवी संघटना शेतकºयांच्या पाठीशी असून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देतेवेळी विदर्भ व्यसनमुक्ती संघटनेचे सल्लागार यशवंत उके, सरपंच राधेशाम झोडे, रत्नाकर बोरकर, भानुदास वलगाये, आदर्श युवा गृपचे सदस्य, परिसरातील गावांचे सरपंच, शेषराव महाराज, व्यसनमुक्ती संघटनेचे सदस्य आणि शेतकरी उपस्थित होते.