अपघातात पती ठार, पत्नी गंभीर जखमी

0
19

अर्जुनी मोरगाव,दि.30 : भरधाव टवेरा वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत पती ठार तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि.३०) सायकांळी ५ वाजताच्या सुमारास कोहमारा-अर्जुनी मोरगाव मार्गावरील येरंडी गावाजवळ घडली. प्रकाश शिवणकर, रा. पिंपळगाव खांबी असे अपघातात ठार झालेल्या पतीचे नाव आहे तर वनिता शिवणकर असे अपघातात जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार शिवणकर दाम्पत्य हे बौध्दनगर (परसोडी) येथून मोटारसायकलने परत येत होते. दरम्यान अर्जुनी-मोरगाव कडून येणाऱ्या टवेरा वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात प्रकाश शिवणकर जागीच ठार झाले तर पत्नी वनिता शिवणकर गंभीर जखमी झाली. तिच्या पायाला दुखापत झाली. त्यांना नवेगावबांध येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकाश शिवणकर यांचे नुकतेच लग्न झाले. ते बौध्दनगरवरुन कोहमारा मार्गे सासरवाडीवरुन परत येत होते. दरम्यान या अपघातात शिवणकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. मोटारसायकलला धडक देणारी टवेरा गाडी कुणाच्या मालकीच्या हे अद्यापही कळू शकले नाही. अपघातानंतर टवेरा गाडीचा वाहनचालक घटना स्थळावरुन पसार झाला. या अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी तब्बल दोन तास जमाव करुन मृतकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी अर्जुनी मोरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.