समाजातील सर्वच घटक विद्यमान सरकारला कंटाळले – राधाकृष्ण विखे पाटील

0
30

२०१९ मध्ये जनताच भाजपाला सत्तेतून क्लिन चिट देईल
शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे काम कौतुकास्पद

यवतमाळ,दि.30 : शेतकरी आत्महत्या, शेतमालाचे पडलेले भाव, वाढती गुन्हेगारी यासह प्रत्येकच क्षेत्रात विद्यमान सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. समाजातील सर्वच घटक या सरकारला कंटाळले आहेत. भाजपाशी संबंधीत असलेल्यांना कोणत्याही चौकशी शिवाय क्लिन चिट देणा-या या सरकारला जनता येत्या निवडणुकीत राज्यातून क्लिन करेल असे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
घाटंजी तालुक्यातील राजुरवाडी येथे आत्महत्याग्रस्त कुटूंबांना सांत्वना भेटीच्या वेळी ते उपस्थितांशी बोलत होते. यावेळी त्यांचे सोबत माजी आमदार विजय खडसे, शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, संपुर्ण महाराष्ट्रात शेतक-यांची दयनीय अवस्था आहे. गेल्या चार वर्षात शेतमालाचे भाव अध्र्यावर आले. कर्जमाफीचा लाभ अगदीच तुरळक शेतक-यांना मिळाला. गुलाबी बोंड अळीने नुकसान झालेल्या शेतक-यांना अद्याप शासनाने जाहिर केलेली भरपाई मिळालेली नाही. प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्यात शेतक-यांची स्थिती अत्यंत भीषण आहे. शेतकरी थेट सरकार व पंतप्रधानांचे नाव चिठ्ठीत लिहुन आत्महत्या करीत आहेत. यावरूनच या सरकार विरोधात किती असंतोष आहे ते स्पष्ट होते असे ते म्हणाले.
दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज घाटंजी तालुक्यातील राजुरवाडी येथे मुतक शेतकरी शंकर चायरे व प्रकाश मानगावकर यांच्या कुटूंबियांशी जिव्हाळ्याने संवाद साधला. दोन्ही कुटूंबाच्या अडचणी समजुन घेत त्यांनी कॉंग्रेस पक्षातर्फे दोन्ही कुटूंबांना प्रत्येकी एक लाख रूपये मदत देण्याचे कबुल केले. शिवाय कुटूंबातील मुलांच्या संपुर्ण शिक्षणाची जबाबदारी त्यांनी स्विकारली.
पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावातील शेतकरी स्वत: सरण रचून आत्महत्या करतो व प्रशासन त्याला अपघात असल्याचे सिद्ध करण्यास पुढे येते यावरून प्रशासनावर किती राजकीय दबाव आहे हे स्पष्ट होते असे ते म्हणाले. पिंपरी बुटी येथे आत्महत्या करणा-या शेतक-याच्या घरी मुख्यमंत्री भेट देतात व त्यानंतर त्या शेतक-याची पत्नी सुद्धा काही काळाने आत्महत्या करते यावरूनच या सरकार व मुख्यमंत्र्यांवर जनतेचा विश्वास नाही हे स्पष्ट आहे. राजकीय दबावातून चुकीचे अहवाल देऊन आत्महत्यांना अपात्र ठरविणा-या अधिका-यांची चौकशी करून त्यांना निलंबीत करण्याची मागणी विधानसभेत करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार हे शेतक-यांसह समाजातील इतर घटकांसाठी लढा देऊन त्यांना न्याय देण्याचे कार्य उत्तमपणे करीत आहेत. त्यांनी शेतक-यांच्या पाठीशी असेच उभे राहावे. विरोधी पक्षनेता म्हणुन त्यांना खंबीर साथ देऊ असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सैय्यद रफिक बाबु, संजय निकडे, शालिकबाबु चवरडोल, संजय डंभारे, गजानन पाथोडे, गोपाल उमरे, रजनिश मानगावकर, रोहितसिंग सिद्धु, रमेश पाचपवार,श्रवण देठे,विनोद मडावी, वासुदेव राठोड,वसंत पवार, सैय्यद छब्बु यांचेसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते

शेतकरी सांत्वना भेटीकडे स्थानिक कॉंग्रेस पदाधिका-यांची पाठ
विधासनभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील घाटंजी तालुक्यात असूनही स्थानिक कॉंग्रेस नेते शिवाजीराव मोघे यांचेसह कॉंग्रेसच्या पदाधिका-यांनी या दौ-याकडे पाठ फिरवीली. राजकीय विरोधकाला सोबत घेतल्याने या भेटीवर त्यांनी बहिष्कार टाकला. पक्षाचे राज्यातील प्रमुख नेते तालुक्यात असतांना स्थानिक कॉंग्रेसचा एकही पदाधिकारी तिथे उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात होते. शेतक-यांच्या प्रश्नावरही वैय्यक्तीक वाद मध्ये आणुन घाणेरडे राजकारण केल्या जात असल्याबद्दल यावेळी नाराजीचा सुर होता.