चितळाच्या मांसासह पाच शिकाऱ्यांना अटक

0
13

चंद्रपूर,दि.01 : वन्यप्राण्यांची शिकार करुन त्याचे मांस विक्री करीत असताना वनविभागाने धाड टाकून पाच आरोपींना अटक केली. यात वन्यप्राण्याचा मृतदेह व मांस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई रविवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.वन्यप्राण्यांची शिकार करून मांस विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मोहुर्लीचे वनपाल धर्मेद राऊत यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर वनविभागाच्या पथकाने मोहुली वनपरिक्षेत्रातील बफरझोन क्षेत्रात असलेल्या सितारामपेठ येथील एका नागरिकाच्या घरी धाड टाकली. या ठिकाणी चितळ व बेडकीच्या मांसाची विल्हेवाट लावताना आढळून आले. वनविभागाच्या पथकाने पाच जणांना अटक केली.
यावेळी घटनास्थळावरुन चितळाचे मांस व मृतावस्थेतील बेडकी (हरिण), पावशी व सत्तूर जप्त केले. ही कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.रमेश नाथ (४०), भाऊजी उईके (४५), विकास चौखे (३५), संजय मडावी (२३), बंडू मडावी (३०) सर्व रा. सितारामपेठ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सदर कारवाई वनपाल धर्मेद राऊत वनपरिक्षेत्र अधिकारी चिडे, वनमजूर आडे व वनविभागाच्या पथकातील कर्मचाºयांनी केली.