पुरोगामी राज्य अशी महाराष्ट्राची प्रतिमा जपण्यास सहकार्य करा – पालकमंत्री

0
5

गडचिरोली दि.१:: राज्याच्या स्थापनेपासून महाराष्ट्र सर्वच बाबतीत अग्रेसर आहे. एकता व एकात्मता जपताना राज्याने पुरोगामी राज्य अशी प्रतिमा जपली आहे ती कायम ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री राजे अंम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 58 वा वर्धापन दिन सोहळा आज येथे पोलीस कवायत मैदानावर झाला. याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आदींची उपस्थिती होती. विविध धर्म आणि पंथ असणाऱ्या लोकांचे असणारे आपले महाराष्ट्र राज्य अनेक भाषा व परंपरा जपत आहे. राज्यात स्थापनेपासून सामाजिक व आर्थिक न्याय देण्याचे काम सुरु आहे. याचा आपणा सर्वांना अभियान आहे, असे पालकमंत्री म्हणाले.
आज देशापुढे अनेक समस्या आहेत. त्यात प्रामुख्याने विघटनवादी शक्तीचा उल्लेख करावा लागेल. तसेच देशांतर्गत आपल्या राज्यासह इतर शेजारी राज्यात सुध्दा नक्षल चळवळीमुळे अशांतता निर्माण झालेली आहे. या परिस्थितीचा मुकाबला करण्याची जबाबदारी ही शासनाची असून ही जबाबदारी समर्थपणे पेलल्या जात आहे. हे करीत असताना अनेक जवानांनी आपले बलिदान दिलेले आहे. त्या जवानांचे या दिवशी स्मरण करुन त्यांना अभिवादन करतो. या चळवळीचा बिमोड करण्यात पोलीस दलाच्या जवानांनी नुकतेच जे शौर्य दाखवले त्या जवानांचे त्यांनी यावेळी अभिनंदन केले. अशा शक्तीचा विमोड करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. हे राज्य शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराचा अंगिकार करणारा आहे असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या नेतृत्वात पोलीस जवानांचे महिला व पुरुष पथक आणि होमगार्डच्या पथकानी संचलन केले. सोबतच बॉम्बशोधक पथकांनीही यामध्ये सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संचलन क्रीडा अधिकारी मदन टापरे यांनी केले तर आभार अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी यांनी मानले.