पोलीस भरती घोटाळा: पुणे, नांदेडमध्ये पुन्हा परीक्षा होणार

0
8

नांदेड,दि.2: पोलीस भरतीत घोटाळा झाल्याचे पुढे आल्यानंतर आता नांदेड आणि पुण्यात पुन्हा लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. नांदेडमध्ये झालेल्या पोलीस भरती परीक्षेत घोटाळा झाल्याचे पुढे आले होते. यानंतर पोलीस अधिक्षकांनी परीक्षा रद्द करण्यात आल्याचे सांगितले. नांदेडपाठोपाठ पुण्यातील पोलीस भरती परीक्षासुद्धा रद्द करण्यात आली. विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणचे कंत्राट एसएसजी कंपनीला मिळाले होते.

नांदेडमधील फेर लेखी परीक्षेची तारीख आज संध्याकाळपर्यंत जाहीर होणार आहे. याचा फायदा शेकडो विद्यार्थ्यांना होणार आहे. 72 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. एकूण 1198 उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली होती. याठिकाणी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांकडून रोख रक्कम घेऊन काही विद्यार्थ्यांचे गुण वाढवण्यात आले होते. या विद्यार्थ्यांना पुढे पोलीस भरती परीक्षा देता येणार नाही.पोलीस भरती परीक्षा घोटाळ्याचा सूत्रधार प्रवीण भटकर आणि त्याच्या साथीदाराने एसआरपीएफच्या उमेदवारांकडून 2.50 कोटी रुपये जमा केले, अशीही माहिती पोलीस तपासात उघड झाली. त्यानंतर आता परीक्षा रद्द करण्याची वेळ आली. प्रवीण भटकरच्या एसएसजी या कंपनीकडे उत्तरपत्रिका तपासण्याचे काम देण्यात आले होते. याचाच गैरफायदा घेत या कंपनीने उमेदवारांकडून पैसे उकळले आणि हा घोटाळा केला.