सहा वर्षांचा अर्नव दोन दिवसांपासून बेपत्ता

0
97

गडचिरोली,दि.2 – येथील पंचवटी नगरातील रहिवासी डॉ. नंदा हटवार यांचा मुलगा अर्नव हटवार (६) हा ३० एप्रिल २०१८ सायंकाळी ७.१५ वाजतापासून घराजवळून बेपत्ता झाला आहे. याबाबत गडचिरोली पोलिस ठाण्यात १ मे रोजी हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र अद्यापही अर्नवचा कोणताही सुगावा लागला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे, अशी माहिती अनर्वची आई डॉ. नंदा हटवार यांनी आज २ मे रोजी स्थानिक प्रेसक्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पत्रकार परिषदेला डॉ. रूपेश हटवार, तुषार चन्नावार उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉ. हटवार यांनी सांगितले की, अर्नव हा आपल्या आजीबरोबर बाहेरून आल्यानंतर घराजवळील मित्राकडे खेळण्याकरीता गेला असता, अज्ञात इसमाने अर्नवला उचलून नेल्याची माहिती समोर आली आहे. गडचिरोली शहरात लहान मुलांना पळविण्याची ही तिसरी वेळ आहे. याअगोदर देसाईगंज शहरात असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. शिक्षकाच्या समयसुचकतेने या मुलांना वाचविण्यात आले होते. मात्र अर्नव हा दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. अर्नवला शोधण्याकरीता पोलीस विभाग कोणत्याही प्रकारची काळजी घेत नसल्याचा आरोप अर्नवची आई डॉ. नंदा हटवार यांनी केला आहे.
डॉ. नंदा हटवार यांनी संशयीत व्यक्ती म्हणून आपले पती डॉ. अतुल सुरजागडे यांच्यावर आरोप लावला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा पतीबरोबर घटस्फोट झाला आहे. त्यामुळे या वादातूनच त्यांनीच माझ्या मुलाचे अपहरण केले असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पोलिस विभागाने त्यांचा शोध घेऊन लवकरात लवकर बेपत्ता झालेल्या माझ्या मुलाला शोधून काढावे, अशी मागणी डॉ. नंदा हटवार यांनी यावेळी केली आहे.
तसेच अर्नवबाबत कुणालाही माहिती असल्यास त्यांनी त्वरित डॉ. नंदा हटवार यांच्याशी संपर्क साधावा. (मो. नं. ७०८३०६२१८४, ८००७१५४२५७) अनुचित प्रकार घडू नये, याकरीता अर्नवला पोलिस विभागाने शोधून काढावे, अशी मागणी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्याकडे करण्यात आली आहे. अर्नवला गंभीर आजार असल्याने त्याची औषधी सतत सुरू ठेवावी लागते. तसेच त्याला वडिलांनीच नेले असल्याची माहिती एका व्यक्तीकडून मिळाली आहे. त्यामुळे अर्नवला त्याच्या वडिलानेच नेले आहे. अर्नवचे वडिल गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. तसेच अनेक प्रकरणात त्यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे अर्नवच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याची दखल घेवून पोलिस विभागाने तातडीने अर्नवचा सुगावा लावावा, अशीही मागणी डॉ. हटवार यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.