रेतीच्या नावाखाली दारूची तस्करी

0
12

भंडारा,दि.03ः- लाखनी पोलीस ठाणेंतर्गंत बुधवारला पोलीस विभागाने केलेल्या कारवाईमध्ये, रेतीची वाहतुक करणाऱ्या टिप्परमधुन दारूची तस्करी केली जात असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी लाखनी पोलीसांनी टिप्परचालकाविरुध्द गुन्हा नोंद केला आहे.

रेती(माती) वाहतुक करणाऱ्या पिवळया रंगाच्या टिप्परमधुन दारूची वाहतुक केली जात असल्याची गुप्त माहिती, लाखनी पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी लाखनी पोलीस स्टेशन समोर गस्त वाढवुन, ये – जा करणाऱ्या वाहनांची कसुन तपासणी करण्यास सुरवात केली. तपासणी करीत असतांना समोरून येणाऱ्या एका पीवळया रंगाच्या टिप्परला थांबण्याचा इशारा दिला. परंतु टिप्पर चालकाने वाहनाचा वेग वाढवुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला असता, तेथे उपस्थित पोलीसांनी त्याला अडवुन टिप्परची कसुन तपासणी केली.
पोलीसांना टिप्परच्या वरच्या भागाला वाळु व आतील भागात दारूचे पेटारे आढळुन आले, पोलीसांनी सदर टिप्पर पोलीस स्टेशनमध्ये जमा केला असुन, जप्त केलेली दारू कुठे वाहहुन नेली जात होती याचा पोलीस शोध घेत आहेत.जिल्हयात अवैध दारू विक्री व वाहतुकीच्या प्रमाणात वाढ झाली असुन, रेती वाहतुकीच्या आडमध्ये मोठया प्रमाणात दारूची तस्करी केली जात असल्याची गावकऱ्यांत चर्चा आहे.