त्या ‘नराधमा’ला फाशीच द्या- बिरसामुंडा ब्रिगेड

0
18

सामाजिक संघटना आणि पालकांचा सरकारला आग्रह

मुलीच्या वैद्यकीय तपासणीत अक्षम्य दिरंगाई

महिला अत्याचार प्रतिबंधक समित्या अनभिज्ञ

देवरी,दि.०३- देशात सर्वत्र महिला अत्याचारावर आक्रोश होत असताना देवरी सारख्या आदिवासी आणि अतिदुर्गम भागातील एका अकरा वर्षीय मतिमंद बालिकेला कुस्करण्याचे महापातक एका वासनांध नराधमाने गेल्या रविवारी (दि.२९) केले. त्या ‘नराधमा’ला फाशीची शिक्षा हाच पर्याय असावा, अशी मागणी बिरसा ब्रिगेड आणि आदिवासी हलबा हलबी या संघटनांनी सरकारकडे केली आहे. या संदर्भात आज देवरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत राज्यपाल, मुख्यमंत्री, महिला व बाल कल्याण आणि सामाजिक न्याय मंत्र्यांकडे एका निवेदनाच्या माध्यमातून जोरदार मागणी करण्यात आली. दरम्यान, पोलिस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पिडीत बालिकेची वैद्यकीय तपासणी करण्यात चालढकल केल्याने वैद्यकीय अहवालासंदर्भात संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे महिला आणि बालिका अत्याचार प्रकरणात जिल्हास्तरीय दक्षता समित्यांना पोलिसांनी अंधारात ठेवल्याचा आरोपही संघटनांनी केला आहे.
सविस्तर असे की, देवरी या तालुकास्थळापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या भागी येथे गेल्या रविवारी (दि.२९) सायंकाळी पाचच्या सुमारास एका मतिमंद बालिकेवर अत्याचाराची घटना समोर आली आहे. पिडीत अकरा वर्षाची मुलगी ही तिच्या भांवडासह घरी होती. मुलीचे दोन्ही पालक मग्रारोहयोंतर्गत वनविभागाच्या कामावर गेले होते. घराशेजारी राहणारा ५१ वर्षीय आरोपी हा सुद्धा आपल्या घरी एकटाच होता. अत्याचारग्रस्त मुलगी आणि तिचे भावंड ही आरोपीला मामा मानतात आणि त्यांचे एकदुसऱ्याकडे येणेजाणे आहे. घरी कोणी नसल्याची संधी साधून त्या नराधमाने त्या मतिमंद मुलीला स्वतःच्या घरी नेले. काही वेळाने त्या मुलीची मोठी बहीण आरोपीच्या घरी गेली असता आरोपीला त्या बालिकेशी अश्लिल चाळे करीत असताना बघितले. मोठी बहीण आणि गावकऱ्यांच्या लक्षात सदर प्रकरण आल्याचे पाहून आरोपीने पसार होण्याचा प्रयत्न केला. मोठ्या मुलीने घडलेल्या प्रकरणाची माहिती पालकांना दिल्यानंतर त्या आरोपीला पालक आणि गावकऱ्यांनी देवरी पोलिसांच्या स्वाधीन केले.
सदर प्रकरणात देवरी पोलिसांनी आरोपीवर भादवीच्या ३५४, बालिकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाचे कलम ८ व १२ आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ३(२) अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीला ताब्यात घेतले. असे असले  तरी अशा प्रकरणात कडक सूचना असताना पोलिसांनी पिडीत बालिकेची वैद्यकीय तपासणी करण्यात हयगय केली. घटनेला दोन दिवस उलटल्यानंतर पोलिसांनी त्या पिडीतेला गोंदिया येथे वैद्यकीय तपासणीसाठी नेले. गोंदिया येथील कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या मुलीची वैद्यकीय तपासणी न करता देवरी येथे परत पाठविले. नंतर २ मे रोजी पुन्हा पोलिसांनी बालिकेसह गोंदिया गाठल्यावर त्या बालिकेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे सदर प्रकरणात पिडीत महिला व बालकांनी जलद मदत मिळावी, यासाठी शासनाने जिल्हास्तरावर विविध समित्या असल्याचे संघटनांच्या प्रतिनिधींनी देवरीच्या विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, स्थानिक समितीच्या एका सदस्याला संघटनेच्या प्रतिनिधींनी भ्रमणध्वनीवर विचारले असता त्या अधिकाऱ्यांनी आपल्या कानावर हात ठेवत आपल्याला पोलिसांनी वा कोणीही माहिती दिली नसल्याचे म्हटले. यावरून पोलिसांनी या समित्यांनी संदेश दिला किंवा नाही, हे गुलदस्त्यातच आहे. परिणामी, पोलिसांच्या तपासावर आदिवासी संघटना आणि बिरसामुंडा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी संशय व्यक्त केला आहे. या पत्रकार परिषदेत चेतन उईके, लोकनाथ तितराम, मधु दिहारी, हिरालाल भोई, तुकाराम राणे, उत्तम मरकाम, शिवचरण बारसे, संजय परसगाये, शालू पंधरे, रामलाल मडावी, प्रेमलाल कोरोंडे प्रदीप राऊत, कविता उइके आदी संघटक उपस्थित होते.