एमआयडीसी भागात गुन्हेगाराचा निर्घृण खून

0
13

नागपूर,दि.5 : रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर रोडवर फिरायला गेलेल्या तरुणाचा डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. त्याचा मृतदेह एमआयडीसी नागपूर-हिंगणा मार्गावरील आयसी चौकात आढळून आला. ही घटना गुरुवारी रात्री घडली असून, शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. यातील एकाच्या भावाच्या खुनात मृत तरुणाचा सहभाग असल्याने त्याने बदला घेण्यासाठी त्याचा खून केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
श्रीकांत रमेश गुहे (२३, रा. राजगृहनगर, हिंगणा रोड, नागपूर) असे मृताचे नाव असून, पोलिसांनी पंकज अंबादे याच्यासह अन्य दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. श्रीकांतने गुरुवारी रात्री घरी जेवण केले आणि फिरायला बाहेर गेला. त्यानंतर तो घरी परतला नाही. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ‘मॉर्निंग वॉक’ला गेलेल्या नागरिकांना त्याचा मृतदेह आयसी चौकात रोडच्या कडेला पडला असल्याचे निदर्शनास आले.
पंकज अंबादे यांचा भाऊ अमित याच्या खूनप्रकरणात अजनी (नागपूर) पोलिसांनी श्रीकांतला अटक केली होती. त्यानंतर त्याची नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. तो काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून जामिनावर बाहेर आला होता. याची माहिती पंकजला होती. त्याला त्याच्या भावाच्या खुनाचा बदला घ्यावयाचा होता.
श्रीकांत बाहेर दिसताच पंकज व त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलिसांनी पंकज व त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले आहे. त्याच्या साथीदारांची नावे कळू शकली नाहीत.