ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचे निधन

0
14

मुबंई,दि.6ः- ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचे निधन झाले. आज सकाळी सहा वाजता कांजूरमार्ग येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. 4 मे रोजी त्यांचा 84 वा वाढदिवस होता. या निमित्ताने पुण्यात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र प्रकृती ठिक नसल्याने ते या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत.

‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, असं म्हणत आयुष्यावर प्रेम करायला शिकवणारे अरुण दाते यांच्या निधनानं भावगीतातील शुक्रतारा हरपल्याची भावना व्यक्त होतेय. अरुण दाते १९५५पासून आकाशवाणीवर गाऊ लागले. वयाच्या पन्‍नाशीत त्यांनी भावगीतांवर लक्ष केंद्रित केले. भातुकलीच्या खेळामधली, शुक्रतारा मंदवारा, शतदा प्रेम करावे, स्वरगंगेच्या काठावरती अशी अनेक गाणी अरुण दाते यांनी त्यांच्या सुरेल आवाजाने अजरामर केली. शुक्रतारा मंदवारा हे अरुण दाते यांचे गाणे अतिशय गाजले. १९६२मध्ये अरुण दाते यांच्या शुक्रतारा मंदवारा या पहिल्या गीताची ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली. दाते यांनी हे गाणे गावे, यासाठी संगीत दिग्दर्शक त्यांना कायम आग्रह करायचे. आपण हिंदीभाषिक प्रदेशातील असल्याने मराठी उच्चार शुद्ध नसल्याचे कारण सांगून दाते यांनी सुरुवातीला तीन वर्षे ते गाणे गायचे टाळले. मात्र अखेर हे गाणे ध्वनिमुद्रित झाले आणि ते अफाट गाजले. यानंतर पुढे अरुण दाते आपल्या कार्यक्रमांमध्येही ‘शुक्रतारा’ गाऊ लागले. २०१०पर्यंत अरुण दाते यांनी शुक्रतारा या नावाने मराठी भावगीत गायनाचे २५००हून अधिक कार्यक्रम केले. अरुण दाते यांच्या निधनानं मराठी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होतेय.