‘आसूड यात्रा’ १४ मेपासून

0
9

यवतमाळ ,दि.7: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना ‘साले’ म्हटल्यामुळे शेतकऱ्यांचे ‘जावई’ झालेल्या दानवे यांना धोंड्याच्या महिन्यात ‘आहेर’ देण्यात येणार आहे. त्यासाठी मोदी यांच्या यांनी निवडणुकीपूर्वी ‘चाय पे चर्चा’ करीत आश्वासने दिलेल्या दाभडी ते दानवे यांच्या भोकरदनपर्यंत १४ मे या छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीपासून ‘शेतकऱ्यांची आसूड यात्रा’ दाभडीपासून काढण्यात येईल, असे प्रहारचे राज्यप्रमुख प्रमोद कुदळे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत सांगितले. १४मे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीपासून ही ‘आसूड यात्रा’ दाभडीपासून निघेल. यवतमाळ, धामणगाव, मोझरी, अमरावती, दर्यापूर, आकोट, अकोला, बाळापूर, खामगाव, शेगाव, बुलडाणा मार्गे १७ मे रोजी दानवे यांच्या जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे यात्रा पोहचेल. यात्रेदरम्यान ठिकठिकाणी सभा होणार आहे. शेवटची जाहीर सभा भोकरदन येथे होणार असल्याचे प्रमोद कुदळे यांनी सांगितले. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, शेतकऱ्यांना किमान वेतन लागू करा, शेतकऱ्यांना अपघात विमा लागू करा, हमी भावापेक्षा कमी भावाने शेतमाल खरेदी करण्याऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशा मागण्या यावेळी करण्यात येणार आहेत. पत्रपरिषदेला प्रहारचे जिल्हाप्रमुख नितीन मिर्झापुरे, अंकुश वानखेडे उपस्थित होते.