लोकसभा पोटनिवडणुक भाजपचे उमेदवार हेमंत पटले तर सुनिल फुंडे राष्ट्रवादीचे !

0
8

गोंदिया,दि.7ःः भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाकरीता येत्या 28 मे रोजी होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीकरीता भारतीय जनता पक्षाने माजी आमदार व भारतीय जनता पक्षाचे गोंदिया जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांना उमेदवारी पक्की केल्याची माहिती सुत्राकडून मिळाली आहे.त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार पटेलांची सहकारी व पटोलेंचे मित्र असलेले भंडारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल को ऑप बँकचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या नावावर एकमत झाल्याची चर्चा येत आहे. मात्र जोपर्यंत दोन्ही पक्ष स्वतःआपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार नाही,तोपर्यंत खरा उमेदवार कोण हे मात्र गुलदस्त्यातच म्हणावे लागणार आहे.
सुनील फुंडे हे नाना पटोले यांचे मित्र असल्याने यांचीही उमेदवारी वजनदार ठरू शकते जातीने कुणबी,सहकार क्षेत्रात मजबूत ,मित्र मंडळी आणि दोन्ही जिल्ह्यात नेटवर्क असल्याने राजकीय क्षेत्रात प्रभाव आहे.त्यामुळे राष्ट्रवादीतर्फे मातब्बर उमेदवार म्हणून ज्यांच्या नावावर चर्चा होती ते विजय शिवणकर मागे पडल्याची चर्चा आहे.विशेष शिवणकर यांना उमेदवारी मिळू नये यासाठी भाजपच्याही काही वरिष्ठ जे नेहमीच या जिल्ह्यात लुडबूड करतात त्यांनी हातभार लावल्याची चर्चा सुरु झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे व माजी आमदार हेमंत पटले यापैकी कुणाला उमेदवार ठरवायचा यावर गेल्या दोन दिवसापासून वरच्यापातळीवर मंथन सुरु होते.त्यामध्ये हेमंत पटले यांनी पक्षाच्या  विरोधात व वरिष्ठ नेत्यांच्या  विरोधात कुठलेही कार्य केलेले नाही.उलट पक्षाने जसे सांगितले तसे सतत भूमिका घेतल्याचा लाभ मिळाल्याचे बोलले जात आहे.

ड़ाॅ.बाेपचे यांनी गेल्या दीड वर्षात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून जिल्ह्यासह देशपातळीवर ओबीसीच्या हक्कासाठी केंद्र व राज्यातील भाजपचे सरकार असतानाही कार्य केले.विशेष म्हणजे ओबीसी समाजाच्या मंत्रालयासोबतच शिष्यवृत्ती व आरक्षणासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर व दिल्ली येथे गेल्यावर्षी पार पडलेल्या महाधिवेशनात महत्वाची भूमिका पार पाडल्याने भाजपच्या केंद्रातील एका नेत्याने ओबीसींच काम करणारा उमेदवार आपल्याला द्यायचे नाही, अशी भूमिका घेतल्याची चर्चा बाहेर आली आहे.त्या चर्चेनुसारच बोपचे यांच्याएैवजी हेमंत पटले यांना उमेदवारी जाहिर करण्यात आल्याची माहीती सुत्रांनी दिली.