‘भारिप’चा राष्ट्रवादीला पाठिंब्यास नकार

0
10

नागपूर,दि.7 : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील भारिप-बहुजन महासंघाने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारास पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. केवळ नाना पटोले उमेदवार असतील तरच समर्थन देण्यात येईल, असे भारिपचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात पत्रपरिषदेच्या माध्यमातून त्यांनी पक्षाची भूमिका मांडली. भारिपच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीसमोर निवडणुकीमध्ये आव्हान वाढण्याची शक्यता आहे.
भाजपाच्या हुकू मशाहीला आणि चुकीच्या धोरणाला कंटाळून नाना पटोले यांनी पक्षाचा राजीनामा दिला व काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१४ च्या निवडणुकीत पटोले यांनी प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. त्यामुळे खऱ्या अर्थाने या जागेची उमेदवारी नाना पटोले यांनाच मिळणे अपेक्षित होते. मात्र काँग्रेसने पटोले यांचा हक्क डावलून ही जागा राष्ट्रवादीसाठी सोडली आहे. हा पटोले यांच्यावर अन्याय असल्याचा आरोप सोनोने यांनी यावेळी केला. पटोले हे भारिप बहुजन महासंघाच्या विचाराचे आहेत, त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली तरच पक्षातर्फे त्यांना समर्थन देण्यात येईल. इतर कुठल्याही उमेदवाराला समर्थन देण्यात येणार नाही, असे सोनोने यांनी सांगितले. पत्रपरिषदेत महासंघाचे प्रदेश महासचिव अमित भुईगळ, कुशल मेश्राम, युसूफ पुंजानी, हरिभाऊ भदे, राजू लोखंडे, गुणवंत देवपारे, रमेश पाटील, पुरुषोत्तम डाकफोडे, दामोधर साव आदी उपस्थित होते.