गडचिरोलीच्या विकासासाठी तुम्ही जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक व्हा- शरद शेलार

0
10

महाराष्ट्र दर्शन सहलीच्या समारोप कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आवाहन

नागपूर,दि. ८ ः- प्रगतीचे पहिले पाऊल हे शिक्षण असून देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांनो तुम्ही चांगले उच्च शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. या शिक्षणाद्वारे तुम्ही जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक अशा मोठ्या पदावर जाऊन गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावावा, असे आवाहन नक्षल विरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक शरद शेलार यांनी केले.
शासनामार्फत आपला महाराष्ट्र सुवर्ण जंयती सहल योजनेंतर्गत आयोजित केलेल्या गडचिरोलीतील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची महाराष्ट्र दर्शन सहल नागपूरात आली असता नक्षल विरोधी अभियान, नागपूर, मैत्री परिवार व साई भक्त साई सेवक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती मार्गावरील पत्रकार सहनिवास परिसरातील साई श्रध्दा लॉन येथे आयोजित केलेल्या समारंभात ते बोलत होते.
मंचावर सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे, मैत्री परिवाराचे अध्यक्ष संजय भेंडे, सचिव प्रमोद पेंडके, ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित, प्रसिध्द शेफ विष्णु मनोहर, राजीव जैस्वाल, पोलीस उपअधिक्षक संजीव म्हैसेकर, निरंजन वासेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
आजचे हे विद्यार्थी उद्याचे जबाबदार नागरीक आहेत, असे सांगत श्री. शेलार म्हणाले की, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उर्वरीत महाराष्ट्राचा झालेला विकास दाखवून त्यांच्या बौध्दीक, शैक्षणिक विकासासाठी शासनामार्फत ही सहल आयोजित केली जाते. या सहलीत केवळ दुर्गम भागातील विद्यार्थीच नव्हे, तर नक्षली हल्ल्यात मारल्या गेलेल्या परिवारातील सदस्य, नक्षल नातेवाईक सदस्य अशा विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. कोवळ्या वयात ही मुले वाईट विचाराकडे प्रवृत्त होऊ नये म्हणून शासन या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सकारात्मक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षणाकडेच लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. गडचिरोलीच्या विकासासाठी चांगले उच्च शिक्षण मिळवून मोठे अधिकारी होऊन तुम्ही गडचिरोलीचा विकास करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
शिवाजी बोडखे म्हणाले, दुर्गम भागात शासनामार्फत विकास करण्यात येत असून माणसांना माणसांशी जोडण्यासाठी दुरसंचाराचे जाळे मोठ्या प्रमाणावर उभारण्यात येत आहेत. या माध्यमांचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी चांगल्या माहितीचे आदान-प्रदान करून शिक्षणात लाभ करून घ्यावा. तसेच या सहलीचा लाभ घेऊन आपल्या इतर सहकारी विद्यार्थ्यांना सहलीबाबत सांगून गडचिरोलीसाठी ज्ञानदुत म्हणून कार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
श्रीपाद अपराजित म्हणाले, ज्या भागात साधी बस जात नाही, त्या भागातील मुलांना मुंबईसह उर्वरीत महाराष्ट्राचे दर्शन घडवून पोलीस विभागाने कौतुकास्पद कार्यक्रम हाती घेतला आहे. पोलिस विभागाने नुकत्याच केलेल्या गडचिरोलीतील धाडसी कारवाईमुळे देशातील नागरीकांचे मनोबल वाढले आहे. हा देश संविधानावर विश्वास ठेवणारा बुध्दांच्या शांतीचा देश असून वाईट विचार माणना-यांनी आत्ताच सावरून जगा आणि जगू द्या, ही परंपरा जोपासण्याची आवश्यकता आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
प्रमोद पेंडके म्हणाले, गरीबीला दूर करण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनो उच्च शिक्षण घेऊन देशाच्या विकासाला हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. संचालन व आभार प्रदर्शन प्रा. माधुरी यावलकर यांनी केले. कार्यक्रमात पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी व सहलीतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.