दुर्मिळ करु वृक्षाची होणार गोंदिया-कोहमारा मार्गावर लागवड

0
172

गोंदिया,दि.9ःनिसर्गाच्या विविधतेमध्ये करुचे झाड हे वेगळेपण दाखविणारे झाड अाहे.या झाडाचा रंग त्रृतुनुसार बदल असतो. हे वृक्ष दुर्मिळ समजले जाते. या दुर्मिळ वृक्षाचे जतन करुन पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी गोंदिया-कोहमारा मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा करुच्या वृक्षांची लागवड करण्याची संकल्पना जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी आखली आहे.सोबतच पिवळा व लाल पळस सुध्दा या झाडांच्या मध्ये लावण्यात येणार आहे. त्यामुळे हा मार्ग पळसफुलांनी व करुच्या वृक्षांनी भविष्यात बहरणार आहे.

गोरेगाव तालुक्यातील मुरदोली मध्यवर्ती रोपवाटीकेत दुर्मिळ व औषधीयुक्त वनस्पतींची झाडे सुध्दा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. वेळीच या वृक्षांचे जतन न केल्यास भविष्यात या झाडांची चित्र केवळ पुस्तकांमध्ये पाहयला मिळतील. ही वेळ येऊ नये यासाठी जिल्ह्यातील दुर्मिळ प्रजातींच्या वृक्षांच्या बिया संकलीत करुन त्यांचे रोपटे तयार करण्याचे काम गोरेगाव तालुक्यातील मुरदोली येथील रोपवाटीकेत केले जात आहे.पिंपळ आणि वडाच्या रोपवाटीकेचे काम सुरु आहे.जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे व उपवनसरंक्षक युवराज यांच्या पुढाकाराने व वनविभागाच्या सहकार्याने दुर्मिळ वृक्षांचे जतन करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.या रोपवाटीकेत आत्तापर्यंत चार हजार रोपटे तयार करण्यात आली आहे. वड आणि पिंपळाचे रोपटे तयार करण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.

जिल्ह्यावर निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. नवेगावबांध, नागझिरा अभयारण्य, सारस संवर्धन मोहीमेमुळे बाहेरील पर्यटकांना जिल्हाकडे आकर्षीत करण्यास या सर्व गोष्टींची मदत होत आहे. हीच बाब ओळखून काळे यांनी जिल्ह्याचे पूर्ण भ्रमण केले.वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांची मदत घेवून दुर्मिळ होत चाललेल्या वृक्षांच्या बियांचे संकलन करण्यास सांगितले. हे बियाणे गोळा केल्यानंतर त्यांचे रोपटे तयार करण्याचे काम सध्या मुरदोली येथील रोपवाटीकेत सुरू आहे.या रोपवाटिकेत सागवान, बांबू, हिरडा, बेहळा, आंजन, जांभुळ, सिताफळ, सिसू, खैरे, सिसम, मोहाई, सिवन, पारस, पिंपळ, अमलतास, कवट, आपटा, आंबा, विजा, गुलमोहर, बदाम, सासा, करु, सिरस, रिठा, सिंदूर, उतरणजीवा, चिंच, कंरजी, चार, बेल, वड असे एकूण २ लाख ७२ हजार सहाशे पंचवीस रोपटे तयार करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे पिंपळ व वडाचे रोपटे जगत नाही तर पक्ष्यांनी पिंपळ व वडाचे बियाणे खाल्यावर जी विष्ठा बाहेर पडते त्या विष्ठेतूनच पिंपळ व वडाचे झाड तयार होत असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी एस.एम.जाधव यांनी सांगितली. पिंपळ व वडाचे रोप लावण्याचा प्रयोग कधीच रोपवाटीकेत आत्तापर्यंत यशस्वी झालेला नाही.परंतु मुरदोलीच्या रोपवाटिेकेत हा प्रयोग यशस्वीपणे करण्यात आला.उपवनसंरक्षक  एस.युवराज, सहायक वनसंरक्षक एन.एच. शेंडे यांच्या मार्गदर्शनात रोपवाटिकेची देखरेख वनक्षेत्राधिकारी एस.एम.जाधव,वनरक्षक डी.बी. तुरकर रीत आहेत.
वड आणि पिंपळाचे पिकलेले फळ सुखविले जाते. बियाणे सुखल्यानंतर वाफे तयार केले जाते व त्या वाफ्यांमध्ये ताजे शेण व बियाणे मिश्रन करुन टाकण्यात येते. या प्रक्रियेनंतर पाच दिवस पाणी दिले जात नाही. सहाव्या दिवशी वाफ्यावर पाणी टाकून गवताने झाकले जाते. २० ते २५ दिवसात अंकुर आल्यावर रुट ट्रेनर ब्लॉकमध्ये ते रोप जगविले जाते. एक महिन्यानंतर रोपटे पालीथिनमध्ये मातीच्या मिश्रणात घेतले जाते. वड व पिंपळाचे झाड बियाणांपासून जगविण्यासाठी तशी वातावरण निर्मितीही केली जाते. वड व पिंपळाचे बियाणे जानेवारी ते मार्चपर्यंतच उपलब्ध असतात. अतिसुक्ष्म बियाणे हाताळतांना खूप काळजी घ्यावी लागते हे विशेष.या रोपवाटीकेत मिसचेंबर, हार्डलिंग चेंबर, लोखंडी स्टॅन्ड, रुट ट्रेनर आदी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. या रोपवाटीकेला हॉयटेक रोपवाटीका तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे उपवनसंरक्षक एस.युवराज यांनी सांगितले.