एक दिवस मजुरांसोबत खोबा येथे ग्राम रोजगार दिवस

0
15

गोंदिया,दि.९ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामगार दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी एक दिवस मजुरांसोबत ग्राम रोजगार दिवस सडक/अर्जुनी तालुक्यातील खोबा येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून खोबा सरपंच सिंधू मेश्राम होत्या. उदघाटक म्हणून उपसरपंच धनराज आसटकर, प्रमुख अतिथी म्हणून मग्रारोहयोचे सहायक कार्यक्रम अधिकारी भारत बोदेले, विस्तार अधिकारी मोरेश्वर धोंगडे यांची उपस्थिती होती.
श्री.बोदेले यांनी मनरेगाविषयी ग्रामस्थांना कामगार कल्याण मंडळाच्या योजनेबाबतची माहिती दिली. ज्या मजुरांनी १०० दिवस काम केले आहे अशा मजुरांना विविध कल्याणकारी योजनेचा लाभ देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी वैयक्तीक शौचालय, सिंचन विहिर, गुरांचा गोठा, शोष खड्डे व रोहयोच्या कामाचे नियोजन आराखडा तसेच कृषिविषयक कामांची माहिती ग्रामस्थांना पटवून दिली.
श्री.धोंगडे यांनी आरोग्याविषयी आयुष्यमान भारत याबाबतची माहिती दिली. तलाठी श्री.नंदागवळी यांनी आम आदमी विमा योजना, संजय गांधी निराधार योजना, महसूल विभागाकडून मजुरांना आधारकार्ड, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला कृषि सहायक एम.बी.कठाणे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मुन्ना देशपांडे, तालुका व्यवस्थापक सोमेश्वरी कटरे, रोजगार सेवक श्री.भेंडारकर यांचेसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार ग्रामसेविका सुषमा वाढई यांनी मानले.