मुख्य बातम्या:

‘भाऊ’ मुनगंटीवारांची तीन विद्यापीठांत स्वत:च्याच नावे याेजना!

मुंबई,दि.09 – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे १ ऑगस्ट रोजी ‘बांबू हँडिक्राफ्ट अँड आर्ट युनिट’ (BHAU- ‘भाऊ’) सुरू करावेत, असे अादेश राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी दिले अाहेत.काही दिवसांपूर्वी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठक झाली होती. त्याच्या कामाचा आढावा मंगळवारी अर्थमंत्र्यांनी घेतला त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीस महसूलचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वन सचिव विकास खारगे यांच्यासह तिन्ही विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.

राज्याचे वनमंत्री व अर्थमंत्रीपद सांभाळत असलेले सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे विदर्भातील महत्त्वाचे नेते अाहेत. ‘भाऊ’ या टाेपणनावाने ते कार्यकर्ते व जनतेत अाेळखले जातात. त्यामुळे मुनगंटीवारांनी अापल्याच वन खात्यातील याेजना अापल्याच टाेपणनावाने लागू केल्याची चर्चा सुरु झाली अाहे.‘भाऊ’ केंद्र सुरू करण्यासाठी प्रत्येकी ३५ लाख रुपयांचा खर्च येतो. हा निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत विद्यापीठांना उपलब्ध करून दिला जाईल. विद्यापीठांनी तशी मागणी करणारे प्रस्ताव विभागामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावेत, जुलै महिन्यात पुरवणी मागणीद्वारे हा निधी त्यांना उपलब्ध करून दिला जाईल. दरम्यानच्या काळात विद्यापीठांनीही यासंबंधीची प्राथमिक तयारी सुरू करावी, असेही त्यांनी सांगितले. केंद्र शासनाने नुकतेच बांबू मिशनसाठी १२९० कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. यातील अधिकाधिक निधी महाराष्ट्राला मिळेल या दृष्टीने वन विभागाने प्रयत्न करावा, अशा सूचनाही मुनगंटीवार यांनी दिल्या.

Share