राजोली भरनोली व गडचिरोली परिसरात माओवाद्यांनी सोडली पत्रके

0
16

गोंदिया/गडचिरोली,दि.१०-लगतच्या गडचिरोली जिल्ह्यात २२ एप्रिल रोजी झालेल्या पोलिस – नक्षल चकमकीत नक्षली मृतपावले होते. त्या घटनेच्या निषेधार्थ आज (ता.१०) गडचिरोलीत बंद पुकारण्यात आला होता. दरम्यान, जिल्ह्यातील केशोरी पोलिस ठाण्याअंतर्गत राजोली, भरनोली येथे घटनेचा व शासन विरोधी धोरणांचा निषेध करणारी पत्रके व बॅनर लावून नक्षल्यांनी निषेध केला. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गडचिरोली येथे झालेल्या पोलिस – नक्षल चकमकीत ३० च्या नक्षली ठार झाले होते. या घटनेचा निषेध नक्षल्यांनी सुरू केला. त्यातच काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव पोलिस ठाणेअंतर्गत पोलिस-नक्षल चकमक झाली होती. त्यात ६ नक्षल्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातच पुन्हा नक्षल्यांनी घटनेचा निषेध म्हणून गडचिरोली बंदची हाक आज (ता.१०) दिली होती. तसेच गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील केशोरी पोलिस ठाण्याअंतर्गत येणार्‍या राजोली व भरनोली येथे नक्षल्यांनी बॅनर व पत्रक लावून घटनेचा निषेध नोंदविला. या घटनेची दखल पोलिसांनी घेतली आहे.

नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्हात विविध ठिकाणी नक्षलांनी पत्रके टाकून २२ एप्रिल २०१८ रोजीच्या चकमकीचा निषेध करत गडचिरोली जिल्हा बंद पुकारला होता. त्याला गडचिरोली जिल्ह्यातील गावकाऱ्यांकडून ठिकठिकाणी विरोध दिसून आला. नक्षलवाद्यांनी २०१५ साली जारावंडी येथील गजानन मडावी यांचा निर्घृण हत्या केली होती. येथील गावकऱ्यांनी काल बंदचे औचित्य साधुन मडावी यांच्या स्मरणार्थ व नक्षलवाद्यांच्या निषेधार्थ एकत्र येत त्यांचे स्मारक उभारले.
यावेळी गावकरी हे नक्षलवाद्यांच्या राक्षसीपणाला कंटाळले असून त्यांची आता आमच्याशी गाठ असल्याचे एका आदिवासी युवकाने कवितेच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्याचबरोबर नक्षलवाद्यांनी ठिकठिकाणी लावलल्या बॅनर्सची वेगवेगळ्या ठिकाणी गावकऱ्यांनी एकत्र येत होळी केली. बंद यशस्वी व्हावा यासाठी नक्षलवाद्यांनी रस्त्यावर मुद्याम झाडे तोडून टाकली होती. गावकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन ही झाडे बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मदत केली.
तसेच बंद च्या नावाखाली नक्षली मालमत्तेस हानी पोहचवत असून आदिवासी बांधवाना मिळणाऱ्या विविध सुविधांना आडकाठी निर्माण करत आहेत. यामुळेच स्थानिक लोकांकडून बंदला विरोध करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर हा बंद आपल्यावर लादून नक्षली आमचा जगण्याचा हक्क हिरावून घेत आहेत. नक्षलवादी सूडाच्या भावनेतून आदिवासींवर अत्याचार करत असून त्यांचा नाहक खून करत आहेत. त्यांनी हे त्वरीत थांबवावे अन्यथा आम्हा गावकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत होईल अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त करत नक्षलवाद्यांविरोधात घोषणा दिल्या.