मुख्य बातम्या:

१२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव १ जूनपासून सादर करावे

गोंदिया,दि.११ : इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत सन २०१८-१९ मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहे अशा विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव १ जून २०१८ पासून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गोंदिया येथे स्वीकारण्यात येतील. अर्जासोबत शाळेतील प्राचार्य यांचे समितीच्या नावाने शिफारस पत्र, ऑनलाईन अर्ज, अर्जदाराचे जात प्रमाणपत्र, अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला, इतर नातेवाईकांचे शाळा सोडल्याचे दाखले असल्यास फॉर्मसोबत जोडावे. महसूली/शैक्षणिक पुरावे म्हणून अनुसूचित जातीसाठी १० ऑगस्ट १९५० चे पुरावे. इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यांना १३ ऑक्टोबर १९६७ चे पुरावे आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती यांनी २१ नोव्हेंबर १९६१ चे पुरावे सादर करावे. जातीचे शपथपत्र फॉर्म नं.१७ आणि वंशावळ शपथपत्र फॉर्म नं.३ यावर सादर करावे. इतर नातेवाईकांचे जात वैधता प्रमाणपत्र असल्यास जोडावे. अर्जदारांनी कार्यालयात प्रस्ताव सादर करतांना मूळ कागदपत्रे तपासणीसाठी सादर करणे आवश्यक आहे. असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसूदन धारगावे यांनी कळविले आहे.

Share