१९ लाखांची वीज चोरी उघडकीस

0
13

बुलडाणा, दि.११- वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरणची सातत्याने कारवाई सुरूच असून, बुलडाणा जिल्ह्यामध्ये गुरुवारी(दि.१०) महावितरणच्या पथकाने एकाचवेळी आकस्मिक कारवाई केली. यामध्ये बुलडाणा, मलकापूर व खामगाव या तिनही विभागामध्येवीजचोरी व अनियमितता  आढळून आल्यामुळेएकूण २३० जणांवर कारवाई करण्यात आली.यामध्ये जवळपास १९  लाख २८ हजार रुपयांची वीज चोरी झाल्याचे निदर्शनास आले.वीजहानी, गळती व वीजचोरी कमी करण्यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्नशील आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील ग्राहकांना दर्जेदार व अखंडित सेवा देण्यासाठी करोडो रुपये खर्च करून वीज यंत्रणा निर्माण करणे व सक्षमीकरणाची कामे केली आहेत व सुरु आहेत. मात्र काही जण विजेचा चुकीचा व अवैध वापर करीत असल्यामुळे कारवाई करण्यात येत आहे.

प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत व मुख्यअभियंता अरविंद भादिकर यांच्या  निर्देशानुसार अधिक्षक अभियंता जी.एम. कडाळे  यांच्यानेतृत्वाखाली एकूण ४८ पथकांमध्ये कार्यकारीअभियंते  काकाजी रामटेके, बद्रीनाथ जायभाये वपांडुरंग पवार यांचेसह जिल्ह्यातील अभियंते,अधिकारी  व जनमित्र  यांनी  या मोहिमेमध्येसहभाग घेतला. या पथकांनी जिल्ह्यातील शहरीव ग्रामीण भागातील विविध वर्गवारीच्याग्राहकांची तपासणी करण्यात आली.

कारवाई  दरम्यान विद्युत वाहिन्यावर आकोडे/हुक टाकून, वीज मिटरमध्ये हस्तक्षेप करून थेट वीजचोरी तसेच  विजेचा गैरवापर व घेतलेल्या कारणाशिवाय दुस-या कारणासाठी वापर करीत असल्याचे ग्राहक आढळून आले यामध्ये बुलडाणा विभागातील ५१ ग्राहकांनी २ लाख ५१ हजार  तर  खामगाव विभागातील १२५  ग्राहकांनी १४ लाख ६२  हजार आणि मलकापूर विभागातील ५४ ग्राहकांनी  २ लाख १६ हजार रुपयाची वीज चोरी केल्याचे कारवाई दरम्यान आढळून आले. या सर्वांवर   भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ व १२६ नुसार कारवाई करण्यात आली. संबंधितावर कायद्यानुसार पोलीस कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वीसुद्धा  जिल्ह्यामध्ये वीज चोरीविरुद्ध राबविण्यात आलेल्या अनेक  धडक मोहिमेमध्ये अनेक ग्राहकांवर कारवाई करण्यात आली होती . वीजचोरी व गैरप्रकार याविरोधात महावितरण गंभीर असून यापुढे सुद्धा अशाप्रकारे गोपनीय पद्धतीने सामूहिकरीत्या सातत्याने आकस्मिक कारवाई करण्यात येणार आहे. तरी ग्राहकांनी वीजचोरी व गैरवापर टाळून अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन बुलडाणा मंडळाचे अधीक्षक अभियंता गुलाबराव  कडाळे यांनी केले आहे.