भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या पाठिंबाच्या निर्णय लवकरच

0
10

नागपूर,दि.11 :भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीतसंदर्भात शिवसेनेचा पाठिंबा कुणाला राहणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. परंतु सेनेने अद्याप पाठिंब्यासंदर्भात कुठलाही निर्णय घेतलेला नसून पुढील दोन ते तीन दिवस ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ हीच भूमिका राहणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले. विदर्भातील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे शुक्रवारी नागपुरात आले होते. यावेळी पत्रपरिषदेच्या माध्यमतून त्यांनी सेनेची भूमिका मांडली.
पालघर लोकसभा पोटनिवडणूकीत राजकारण बाजूला ठेवून येथे चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना सर्व पक्षांनी पाठिंबा देण्याची गरज आहे. पालघरमध्ये आम्ही त्यांना निवडून आणूच. मात्र कोण त्यांना पाठिंबा देत आहे त्याकडेदेखील आमचे लक्ष आहे. त्यानुसारच भंडारा-गोंदियाची भूमिका ठरविण्यात येईल, असे संकेतदेखील उद्धव ठाकरे यांनी दिले.
विदर्भ विकासाच्या विरोधात शिवसेना नाही. त्यामुळे विदर्भाच्या विकासासाठी वेळ पडली तर शिवसेना रस्त्यावर उतरेल. परंतु विकास हवा म्हणून वेगळे राज्य द्या, असे म्हणणे योग्य नाही. विदर्भ हा महाराष्ट्राचाच अविभाज्य भाग आहे. विदर्भाला तोडण्याची भाषा करणाºयांवर राजद्रोह दाखल व्हावा ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांची भूमिका एकदम योग्य आहे, असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले.यावेळी उद्धव ठाकरे यांनी ‘ईव्हीएम’ प्रणालीवर परत टीकास्त्र सोडले. ‘ईव्हीएम’मध्ये आपले मत नेमके कुणाला गेले हे मतदारांना कळतच नाही. हा एकाप्रकारे लोकशाहीचा अपमानच आहे. ‘व्हीव्हीपॅट’ अनिवार्य व्हावे व अशा प्रयत्नांना शिवसेनेचा पाठिंबाच असेल असे उद्धव ठाकरे म्हणाले.