लोकसभा पोट निवडणूक सोशल मिडियावर सायबर सेलची नजर

0
12

गोंदिया दि. 12 :- भंडारा – गोंदिया लोकसभा मतदारसंघ पोट निवडणूकीच्या काळात सोशल मिडियाचा वापर काळजीपूर्वक करण्यात यावा. सोशल मिडियावर पोस्ट‍ होणाऱ्या मजकुरावर पोलीस विभागाचा सायबर सेल करडी नजर ठेवून आहे. नागरिकांनी फेसबुक, व्हॉट्सॲप, व्टिटर, इंस्टाग्राम व इतर सोशल साईट वर निवडणूक काळात आक्षेपार्ह मजुकर पोस्ट करणे बेकायदेशिर आहे. नागरिकांनी अशा पोस्ट व्हायरल अथवा शेअर करु नये अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल.
स्मार्ट फोनच्या माध्यमातून प्रत्येकजण सोशल मिडियावर सक्रीय झाला आहे. दिवसभरात फेसबुक, व्हॉट्सॲप, व्टिटर, इंस्टाग्राम व इतर सोशल साईट मिडियावर असंख्य संदेश प्राप्त होत असतात. अनेकवेळा हे संदेश न वाचता व खातरजमा न करता फारवर्ड केले जातात. जिल्हयात लोकसभा निवडणूकीची आचार संहिता असल्यामुळे आपल्याला येणारे मॅसेज काळजीपुर्वक वाचून खातरजमा करुनच पुढे पाठवावे. कुठल्याही व्यक्तीची, समाजाची, महिलांची, राजकीय व्यक्तींची प्रतिमा मलिन करणारे मॅसेज फारवर्ड करु नये.
लोकसभेची निवडणूक असल्यामुळे सोशल मिडियावर पोलीस विभागाचे सायबर सेल करडी नजर ठेवून आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मिडिया हाताळतांना अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. आपल्या हातून चुकीचा मॅसेज जावू नये याबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे. सध्या फेसबुक व व्हॉट्सॲपवर विविध राजकीय प्रचाराच्या पोस्ट मोठया प्रमाणात टाकल्या जात आहेत. या मजकुराला सायबर सेल मॉनिटरींग करीत आहे. ही बाब पोस्ट टाकणाऱ्यांनी लक्षात ठेवावी. कोणाचाही अनादर होणार नाही. जातीय तेढ होणार नाही, महिलांची बदनामी होणार नाही. ही काळजी घेण्याची जबाबदारी मजकुर टाकणाऱ्याची व शेअर करणाऱ्याची असणार आहे.
लोकसभा पोटनिवडणूक पेड न्युजसाठी समिती
निवडणूक काळात वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रानिक माध्यमांमधील पेड न्युज आणि जाहिरातीचे सुक्ष्मपणे सनियंत्रण करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पेड न्युज व जाहिरातीच्या खर्चाचा अहवाल नियमित निवडणूक खर्च कक्षाला देण्यात येणार आहे. कुठल्याही समुहावर किंवा घटकावर एखादया उमेदवाराचा प्रभाव टाकणारे वृत्त हे पेड न्युजच्या कक्षेत येते. अशा बातम्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या मिडिया मॉनिटरींग अँड सर्टिफिकेशन कमिटीमार्फत मॉनिटर केले जाणार आहे.
समाधान सेल :- निवडणूकी संदर्भातील तक्रारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्णवेळ समाधान सेल स्थापन करण्यात आला आहे.