पलूस-कडेगाव पोटनिवडुकीतून भाजपची माघार

0
9

सांगली दि. १४ :-: पलूस-कडेगाव पोटनिवडणूकीसाठी काँग्रेसतर्फे उभ्या असलेल्या विश्वजित कदम यांच्या विरोधात भाजपने भरलेला अर्ज मागे घेत या निवडणुकीतून माघार घेतल्याने काँग्रेसच्या विश्वजित कदमांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा झाल्यानंतर माघारीचा निर्णय घेण्यात आला.
ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे पलूस-कडेगाव विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी २८ मे रोजी मतदान तर ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे. रिक्त झालेल्या जागी काँगेसकडून यापूर्वीच युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांना विरोध म्हणून भाजपनेही जिल्हा परिषदेचे विद्ममान अध्यक्ष संग्रामसिहं देशमुख यांचा अर्ज दाखल करुन खळबळ उडवून दिली होती.या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने काँग्रेसला पाठींबा दिला आहे. भाजपनेही उमेदवार न देता ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यावी, अशी विनंती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली होती.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह उमेदवारी अर्ज भरणारे संग्रामसिंह देशमुख यांची बंद दाराआड वीस मिनिटे जवळपास चर्चा झाली.या कोअर कमिटी बैठकीला चंद्रकांत पाटील आणि संग्रामसिंह देशमुख यांच्यासह पृथ्वीराज देशमुख, आमदार सुधीर गाडगीळ, मकरंद देशपांडे राजाराम गरूड आदी उपस्थित होते.