मुख्य बातम्या:

आता मिळणार मताचा पुरावा-जिल्हाधिकारी 

 पहिल्यांदाच व्होटर व्हेरिफीयेबल पेपर ऑडिट ट्रेल प्रणालीचा वापर
भंडारा,दि. 14:- लोकसभा पोट निवडणूकीसाठी कुणाला मत दिले याची खात्री पटवून देण्यासाठी पहिल्यांदाच व्होटर व्हेरिफीयेबल पेपर ऑडिट ट्रेल प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. इव्हीएममध्ये हेराफेरी करण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने ही उपाययोजना आणली आहे. पसंतीच्याच उमेदवाराला मत दिल्याची खात्री स्क्रीन वर बघून करता येणार असून याची अंमलबजावणी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रासाठी प्रथमच होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यु काळे यांनी दिली.
अभिमन्यु काळे म्हणाले की, मत कुणाला दिले याची खात्री करण्यासाठी या निवडणूकीत व्हि.व्हि.पी.ए.टी चा वापर करण्यात येणार आहे. या प्रणालीत मतदानाचा हक्क बजाविल्यानंतर नोंदविलेले मत पसंतीच्या उमेदवारांना झाले की नाही, याची पावती दिसणार आहे. उमेदवारांचे नाव, चिन्ह, यादीतील क्रमांकाचा समावेश त्यात राहणार आहे. नोंदविलेले मत पसंतीच्या उमेदवाराऐवजी अन्य उमेदवाराला मिळत असल्याचे दिसताच केंद्राध्यक्षाकडे तक्रार करता येणार आहे.
सात सेकंदानंतर प्रिंट झालेली पावती प्रिंटरला जोडलेल्या सिलबंद बॉक्समध्ये आपोआपच जमा होईल. ही मते मुद्रित स्वरुपात ठेवण्याची व्यवस्था असणार आहे. या नव्या प्रणालीसंदर्भात सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पार पडले असून या नव्या यंत्रणेमुळे हेराफेरीवर आळा घालण्यास मदत होणार आहे. या प्रणालीमुळे मतदारांमधील संभ्रम दूर होणार असून या निवडणूकीमध्ये भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील मतदारांना याचा वापर करता येईल.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील सर्वच विधान सभा क्षेत्रात ईव्हीएम मशिन सोबत व्हिव्हिपॅटचा वापर प्रथमच केला जाणार आहे. या मशिनच्या वापराबाबत मतदारांमध्ये उत्सुकता असून सर्वच क्षेत्रिय अधिकाऱ्यांना व्हिव्हिपॅटचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नागरिकांना व मतदारांना व्हिव्हिपॅटचा डेमो पाहण्याची सोय केली आहे. व्हिव्हिपॅटमुळे आपले मत नक्की कुठल्या उमेदवाराला गेले याची खात्री मतदार करु शकतो. नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे यासाठी दोन्ही जिल्हयात जनजागृती अभियान राबविले जात आहे. ईव्हीएम व व्हिव्हिपॅटच्या वापरासंबंधीची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध आहे. 

Share