अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी

0
28

मुंबई,-शनिवारपासून सुरू झालेल्या १२ वीच्या परीक्षेतील ऑटिस्टीक विद्यार्थ्यांना यापुढे गणित विषयाबरोबरच विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र आणि वाणिज्य शाखेतील बुक कीपिंग व अकाऊन्टसी या विषयांकरिता साधे कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी येथे दिली. बारावीसोबतच ही सुविधा यापुढे अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले.
लर्निंग डीसेबिलिटिज व ऑटिस्टीक असणार्‍या अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेटर वापरण्याची इच्छा असेल तर त्यांना ते वापरता येणार आहे. हा कॅल्क्युलेटर विद्यार्थ्यांना स्वत:च आणावा लागेल. मात्र, हा फक्त साधा (बेसिक) कॅल्क्युलेटर असेल, मोबाईल फोनमधील कॅल्क्युलेटर किंवा तत्सम कॅक्ल्युलेटर वापरता येणार नाही, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.
लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, पालक संघटना, शिक्षक, शिक्षणतज्ञ यांच्या माध्यमातून ऑटिस्टीक विद्यार्थ्यांना गणितीय संकल्पनांसाठी परीक्षेदरम्यान कॅल्क्युलेटर वापरण्यास परवानगी देण्याची मागणी सातत्याने केली जात होती. या मागणीचा मानवी दृष्टिकोनातून विचार करून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे तावडे म्हणाले.
अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारची सुविधा देण्याची सूचना परिक्षेच्या केंद्र संचालकांना देण्यात आली आहे. तसेच या परिपत्रकाच्या सूचना परीक्षा केंद्रावर प्रसिद्ध करण्याचे निर्देशही देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.