दलितवस्ती योजनेतील रस्ता चारच महिन्यात उखडला

0
37

अभियंत्यासह कंत्राटदारावर कार्यवाहीची मागणी

सुभाष सोनवाने
चिचगड,दि.18 – एकीकडे देशात सर्वत्र भ्रस्टाचार मुक्ततेचा ढोल बदडला जात असताना, दुसरीकडे मात्र, सामाजिक न्याय विभागाच्या दलितवस्ती सुधार योजनेतून चिचगड येथे सुमारे चार लाखाचा निधी खर्च करून तयार करण्यात आलेला सिमेंट रस्ता अवघ्या चार महिन्यात पार उखळून गेला. यामुळे सदर योजनेतील भ्रस्टाचाराचे बिंग फुटले आहे. सदर योजनेतील अभियंते,अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यात मिलीभगत असून या बांधकामात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप चिचगडवासीयांनी केला आहे.
सविस्तर असे की, सामाजिक न्याय विभागांतर्गत ग्राम पंचायत चिचगड येथे दलितवस्ती सुधार योजनेतून 100 मीटर रस्त्याचे बांधकाम गेल्या जानेवारी 2018 मध्ये पूर्ण करण्यात आले. या रस्ता बांधकामावर सुमारे चार लाख रुपयाचा निधी खर्चा झाल्याचे फलक सुद्धा कंत्राटदाराने लावले आहे. हा रस्ता तयार होत असनाना सुद्धा नागरिकांनी या बांधकामाच्या दर्जाविषयी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्याचे बोलले जात आहे. मात्र, पदाधिकाऱ्यांचे कंत्राटदाराशी अर्थ(?)पूर्ण व्यवहार असल्याने संबंधितांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. सदर रस्ता बांधकामाला अवघ्या चार महिन्याचा कालावधी झाला असून हा रस्ता पूर्णतः उखडून गेला आहे. परिणामी, या रस्त्यावरून नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले आहे. पुढे पावसाळा येणार असून ह्या रस्ता बांधकामाचे पुनर्दुरुस्ती न केल्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच  पावसाळ्यामध्ये या रस्त्यावर संभाव्य अपघाताची शंका नागरिकांनी बोलून दाखविली आहे.
अवघ्या चार महिन्यात सिमेंटचा रस्ता उखडल्याने या बांधकामाशी संबंधित अभियंता, पदाधिकारी आणि कंत्राटदारावर चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.