भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक योग्य समन्वयातून सुरक्षा बंदोबस्त करा- जिल्हाधिकारी काळे

0
10

आंतरराज्यीय सीमा परिषद
गोंदिया,दि.18 : येत्या 28 मे रोजी लोकसभा पोटनिवडणूकीसाठी मतदान होणार आहे. गोंदिया हा जिल्हा नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहे. या जिल्ह्याला मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याची तसेच शेजारी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची देखील सीमा लागून आहे. दोन्ही राज्याच्या आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेचा भाग नक्षलदृष्ट्या संवेदनशील असल्यामुळे पोटनिवडणूकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार होणार नाही यासाठी तिनही राज्याच्या सीमेलगतच्या पोलीस यंत्रणेने योग्य समन्वयातून सुरक्षा बंदोबस्त करावा. असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात 18 मे रोजी लोकसभा पोटनिवडणूकीच्या दृष्टीने आयोजित आंतरराज्यीय सीमा परिषदेत सुरक्षेचा आढावा घेतांना श्री.काळे बोलत होते. यावेळी निवडणूक निरीक्षक एन.बी.उपाध्याय, शफुल हक, तेजप्रतापसिंग फुल्का, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, राजनांदगावचे पोलीस अधीक्षक वाय.पी.सिंग, बालाघाटचे पोलीस अधीक्षक अखिल पटेल, अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिश धार्मिक, अपर पोलीस अधीक्षक संदिप आटोळे, कोब्रा बटालियनेचे भाग्यश्री परमार, राजनांदगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनीशंकर चंद्रा, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते (गोंदिया), मंदार जवळे (देवरी), राजीव नवले (आमगाव), नितीन यादव (तिरोडा), शैलेश काळे (कुरखेडा) यांची उपस्थिती होती.
श्री.काळे म्हणाले, निवडणूकीच्या काळात आंतरराज्यीय सीमेवर कडक बंदोबस्त ठेवून जिल्ह्यात अवैध दारु, पैसा येणार नाही यासाठी प्रत्येक वाहनाची कडक तपासणी करावी. तशाचप्रकारची तपासणी नाकाबंदी दरम्यान जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या नाक्यावर देखील करावी. निवडणूकीच्या काळात संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून काम करावे. जिल्ह्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त भागात ज्या मतदान केंद्रावर जाण्यासाठी रस्ते नाही अशा ठिकाणी मतदान पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पायदळ जावे लागणार नाही त्यासाठी बैलगाड्यांची व्यवस्था करावी असे त्यांनी सांगितले.
डॉ.भूजबळ यांनी जिल्ह्यातील आंतरराज्यीय व जिल्ह्यातील विविध ठिकाणी तयार करण्यात आलेल्या तपासणी नाक्यावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून वाहनांची देखील तपासणी करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात मतदानाच्या दृष्टीने मतदान केंद्रावर सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
निवडणूक होत असलेल्या भागातील नक्षलदृष्ट्या संवेदनशील मतदान केंद्रे, भरारी पथके, प्रतिबंधात्मक कारवाई, जमा करण्यात आलेले परवाना शस्त्रे याबाबतची माहिती डॉ.भूजबळ यांनी दिली. ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात 1290 पोलीस बल उपलब्ध असून राज्य राखीव पोलीस दल किंवा केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 11 कंपन्या 1558 पोलीस अधिकारी-पोलीस कर्मचारी व होमगार्डची मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
गडचिरोली परिक्षेत्रात या निवडणूकीच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांनी दिली. उपस्थित निवडणूक निरीक्षकांना नक्षल चळवळीबाबत व त्यांच्या दलमबाबत तसेच जिल्ह्यात कोणते दलम कार्यरत आहेत याबाबतची माहिती देखील त्यांनी दिली.
निवडणूक निरीक्षकांनी पोटनिवडणूकीदरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने तसेच नक्षलग्रस्त भागात मतदानाच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती उपस्थित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. उपस्थितांचे आभार अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे यांनी मानले.